Kalyan Crime news: कल्याण-डोंबिवली पालिकेच्या 'अ' प्रभाग क्षेत्र कार्यालय हद्दीतील वडवली परिसरात बेकायदा बांधकामाच्या सर्वेक्षणासाठी गेलेल्या महापालिकेच्या कारवाई पथकावर हल्ला केल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकासह त्याच्या मुलाने कारवाई रोखण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून लाडकी दांडक्याने मारहाण केली. इतकंच नाही, तर पथकाच्या गाडीची तोडफोड केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कल्याणडोंबिवली महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात माजी नगरसेवक दुर्योधन पाटील, त्यांचा मुलगा वैभव पाटील आणि साथीदाराविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
वाचा >>भिवंडीतील माजी महापौरांना २३ कोटींचा दंड, अवैध दगड-माती उत्खनन, रॉयल्टी चुकवली
'अ' प्रभाग कार्यालयातील कारवाई पथकाला बेकायदा बांधकामाची माहिती मिळाली होती. कारवाई पथकप्रमुख राजेंद्र साळुंखे, अधीक्षक शिरीष गर्गे यांच्यासह आशिष टाक, विलास साळवी, रमेश भाकरे आणि इतर कर्मचारी सर्वेक्षणासाठी तेथे पोहोचले.
माजी नगरसेवक दुर्योधन पाटील मुलासह आले अन्...
पाहणी सुरू असताना तेथे शिंदेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक दुर्योधन पाटील, त्यांचा मुलगा वैभव साथीदारांसह पोहोचले. त्यांनी सर्वेक्षणास मज्जाव केला. यावेळी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून अधिकारी, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण केली.
या घटनेनंतर प्रभागाचे सहायक आयुक्त प्रमोद पाटील यांचा फोन बंद होता. त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली.
अधिकारी पैसे मागत असल्याचा आरोप
माजी नगरसेवक दुर्योधन पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. प्रत्येक रूममागे अधिकारी पैसे मागत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.