महिलांच्या टोळीने फोडली दुकाने, कल्याणमधील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 00:38 IST2018-06-24T00:38:23+5:302018-06-24T00:38:27+5:30
दुकानासमोर ओढणीचा आडोसा घेत सहा महिलांच्या टोळीने कल्याणच्या सहजानंद चौकातील चार ते पाच दुकाने शनिवारी पहाटे फोडली.

महिलांच्या टोळीने फोडली दुकाने, कल्याणमधील घटना
डोंबिवली : दुकानासमोर ओढणीचा आडोसा घेत सहा महिलांच्या टोळीने कल्याणच्या सहजानंद चौकातील चार ते पाच दुकाने शनिवारी पहाटे फोडली. दुकानाचे शटर तोडून चोरी करतानाचा हा प्रकार सीसीटिव्हीमध्ये कैद झाला आहे. या घटनेमुळे व्यापारी वर्गात दहशतीचे वातावरण आहे.
सहजानंद चौक परिसरातील सन सुमन सिटी इमारतीजवळ या महिलांनी दुकानाबाहेर पाहणी करत आसपास कोणी नसल्याची खात्री केली. त्यानंतर दोघींनी शटरला ओढणीचा आडोसा धरला. तर, एका लहान मुलगी दुकानाचे शटर अर्धवट उघडून आत शिरली. ती दुकानातील रोख रक्कम चोरून बाहेर आली. अशाच पद्धतीने या टोळीने तेथील अन्य तीन ते चार दुकानांमधून एक लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.