बेरोजगार तरुणांनी थाटली दुकाने, रिक्षा, ट्रकचालकांची उपासमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 02:58 AM2020-08-05T02:58:16+5:302020-08-05T02:58:55+5:30

लॉकडाऊनचा फटका : कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न; रिक्षा, ट्रकचालकांची उपासमार

Shops set up by unemployed youth | बेरोजगार तरुणांनी थाटली दुकाने, रिक्षा, ट्रकचालकांची उपासमार

बेरोजगार तरुणांनी थाटली दुकाने, रिक्षा, ट्रकचालकांची उपासमार

Next

शशिकांत ठाकूर ।

कासा : कोरोनाच्या काळात लोकडाऊनमुळे अनेक व्यवसाय बंद झाले आहेत. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. हॉटेल व्यवसाय, कपडा व्यवसाय, सलून दुकाने यांना फटका बसला आहे. रिक्षा, ट्रकचालक, प्रवासी वाहनचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे कुटुंबाच्या पोटाची भूक भागवण्यासाठी अनेकांनी चारोटी नाक्याजवळ डहाणू-नाशिक मार्गावर घरगुती उपयोगाची प्लास्टीकच्या वस्तूंची दुकाने थाटली आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या दुकानांत नागरिकही खरेदी करताना दिसत आहेत.

हॉटेलमधील वेटर व स्वयंपाकी, कपडा व्यावसायिकांकडे काम करणारे नोकर, सफाई कामगार, सुरक्षारक्षक यांच्यावर बेरोजगारीची कुºहाड कोसळली आहे. परराज्यातील अनेक कामगार गावी गेले आहेत; मात्र स्थानिक बेरोजगार तरुणांच्या हाताला काम नसल्यामुळे बिकट परिस्थिती झाली आहे. लॉकडाऊन काळात अनेक व्यवसाय-धंदे बंद झाल्यामुळे कुटुंब कसे चालवायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला. शहरात सर्वच बंद असल्यामुळे दुकानाचे भाडे कसे भरायचे याचीही चिंता व्यवसाय करणाऱ्यांना भेडसावत होती. अखेर, यावर उपाय शोधताना रस्त्यावर प्लास्टीकच्या संसारउपयोगी वस्तू विकण्याचा निर्णय अनेकांनी घेतला. त्यामुळे चारोटी नाक्याजवळ डहाणू-नाशिक महामार्गाच्या दोन्ही बाजंूना दुकाने थाटून प्लास्टीकच्या वस्तूविक्रीचे व्यवसाय सुरू केले आहेत.
एका प्लास्टीक विक्रेत्या दुकानदाराने सांगितले की, सर्व वस्तू आम्ही वापी, गुजरात येथील मोठ्या व्यापाºयांकडून आणतो. काही पैसे भरल्यावर उधार माल आणतो. विक्री झाल्यानंतर उर्वरित पैसे भरतो. पूर्वी आम्ही डोक्यावर, मोटारसायकल, रिक्षामधून खेडोपाडी स्वत: जाऊन विकायचो; पण कोरोनामुळे सगळीकडे गावबंदी आहे. त्यामुळे आमच्यासमोर जगायचे कसे, असा प्रश्न होता. त्यामुळे रस्त्याच्या बाजूस दुकान मांडून व्यवसाय करीत आहोत.
आणखी काही दुकानदारांनी सांगितले की, या ठिकाणी मोठी रहदारी असते. दररोज जवळपास ५० ते ६० गावांतील नागरिक या रस्त्याने डहाणू, नाशिक, गुजरात, मुंबईकडे ये-जा करतात. त्यामुळे चांगला व्यवसाय होतो. येथे जवळपास आम्ही झोपडी उभारून राहत आहोत. येथे जागेचे भाडे, वीजबिल भरायचे नाही आणि हा प्लास्टीकचा माल नाशिवंतही नाही. यात मोठमोठ्या कोठ्या, बादली, टब, सूप, चटई, चिमटे, घरगुती वापरायच्या सर्व प्रकारच्या वस्तू विकत असतो.

प्लास्टीकच्या नवनवीन विविध आकर्षक वस्तू असल्याने गिºहाईक विकत घेत आहेत. नाशिवंत माल नसल्याने नुकसान होत नाही. त्यामुळे आमच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटतो.
- रमेश गवळी,
दुकानदार

सध्या शहरात खरेदी करण्यासाठी जायची भीती वाटते. त्यात नेहमी घरगुती उपयोगी पडणाºया वस्तू असल्याने आम्ही खरेदी करीत आहोत.
- सुनीता पाटील,
ग्राहक
 

Web Title: Shops set up by unemployed youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे