ठाण्यातही घडणार नेमबाज
By Admin | Updated: February 27, 2016 02:34 IST2016-02-27T02:34:39+5:302016-02-27T02:34:39+5:30
गेली अनेक वर्षे ठाणे शहरात प्रलंबित असलेला ‘रायफल शूटिंग रेंज’चा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. ठाणे शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे रायफल शूटिंग रेंज उभारण्याच्या निर्णयाला स्थायी

ठाण्यातही घडणार नेमबाज
मुंबई : गेली अनेक वर्षे ठाणे शहरात प्रलंबित असलेला ‘रायफल शूटिंग रेंज’चा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. ठाणे शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे रायफल शूटिंग रेंज उभारण्याच्या निर्णयाला स्थायी सभेत मंजुरी देण्यात आली आहे. दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलातील कै. खंडू रांगणेकर इमारतीच्या तळमजल्यावर ही रायफल शूटिंग रेंज उभारण्यात येणार आहे, अशी माहिती ठाण्याचे महापौर संजय मोरे यांनी दिली.
फेबु्रवारी महिन्याच्या सुरुवातीला ठाण्यात कला-क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ‘लोकमत’ने ठाण्यातील खेळाडूंसाठी पायाभूत सुविधांबाबत आवाज उठवताच ठाणेकरांनी त्याला पाठिंबा दिला. ठाणे शहरात आजघडीला एकही शूटिंग रेंज नसल्याने शूटिंग क्षेत्रात करिअर बनवू पाहणाऱ्या शूटर्सना मुंबईकडे धाव घ्यावी लागत होती. आता मात्र ही पायपीट थांबणार असून, ठाण्यातच ‘शूटिंग स्टार’ घडतील.
महापौर मोरे यांनी या प्रकरणी लक्ष देऊन रायफल शूटिंग रेंज उभारण्यासाठी वेगाने पावले उचलली. स्थायी समिती सभापती नरेश म्हस्के यांच्यासह आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेतली. आयुक्तांनी परवानगी देताच हा प्रस्ताव समितीपुढे मांडून तत्काळ मंजुरी देण्यात आली.
ठाण्यात उभारण्यात येणारी रायफल शूटिंग रेंज ही वातानुकूलित असणार आहे. एकाच वेळी १६ खेळाडू एका रांगेत उभे राहून सराव करण्याची व्यवस्था या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शूटिंग रेंजमध्ये करण्यात आली आहे; शिवाय खेळाडूंना सराव करताना पाहण्यासाठी पालकांसाठीदेखील विशेष व्यवस्था करणार असल्याची माहिती महापौर मोरे यांनी दिली. त्याचबरोबर सिंथेटिक टॅ्रक आणि अन्य प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन मोरे यांनी ठाणेकरांना
दिले. (क्रीडा प्रतिनिधी)