फ्लॅश मीटरचा ग्राहकांना शॉक

By Admin | Updated: November 10, 2016 06:32 IST2016-11-10T06:32:57+5:302016-11-10T06:32:57+5:30

नव्या फ्लॅश मीटरमुळे भरमसाट रकमेच्या बिलांचा शॉक महावितरणने ग्राहकांना दिला असून, वापर नसतानाही हजारो रुपयांची बिले पाहून सर्वांना धक्का बसत आहे.

Shock to the flash meter customers | फ्लॅश मीटरचा ग्राहकांना शॉक

फ्लॅश मीटरचा ग्राहकांना शॉक

वसई : नव्या फ्लॅश मीटरमुळे भरमसाट रकमेच्या बिलांचा शॉक महावितरणने ग्राहकांना दिला असून, वापर नसतानाही हजारो रुपयांची बिले पाहून सर्वांना धक्का बसत आहे.
एमएसईबीच्या काळातील जुने मीटर बदलून महावितरणने इलेक्ट्रॉनिक्स मीटर बसवले होते. ते अल्पावधीतच सदोष झाल्यामुळे बदलून आता महावितरणने फ्लॅश मीटरचा वापर केला. या मीटरचे रीडिंग कॅमेऱ्याद्वारे टिपून त्यानुसार ग्राहकांना बिले दिली जात होती. त्यामुळे वाजवी बिले येत असल्याचे समाधान ग्राहक व्यक्त करीत असतानाच महावितरणने त्यांना ४४० व्होल्टपेक्षा जबर शॉक दिला. हे मीटर बिघडले. शेकडो मीटरचा डिस्प्लेच निकामी झाला.
रीडिंग घेणाऱ्या ठेकेदाराकडून ही बाब महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली नाही. त्यामुळे बंद झालेल्या मीटरचा फोटो डेटा बिले काढणाऱ्या अधिकाऱ्यांना प्राप्त झाला. त्यांनीही आपले कर्तव्य बजावताना मागील महिन्याच्या रीडिंगमध्ये एकने वाढ करून बिले काढली. ठेकेदार आणि बिल काढणाऱ्यांकडून अशी टोलवाटोलवी केल्यावर त्यानंतरच्या महिन्यात तर अशा ग्राहकांना नेहमीच्या बिलापेक्षा दहा-अकरा पटीने वाढ करून बिले पाठवण्यात आली. ही बिले पाहून ग्राहकांची झोपच उडाली. त्यांनी कामाला दांडी मारून महावितरणच्या स्थानिक कार्यालयाकडे धाव घेतली.
या कार्यालयाकडून मागील सर्व बिले आणि वाढीव रीडिंग पाहिल्यानंतर मीटर फॉल्टी असल्याचा रिपोर्ट दिला. हा रिपोर्ट घेऊन अकाउंट कार्यालात दोन-तीन टेबलांवर धक्के खाल्ल्यानतंर अ‍ॅव्हरेज बिले ग्राहकांच्या हाती पडली. ती भरण्यासाठी वीज बिल भरणा केंद्रात पुन्हा रांग लावून बिले भरल्यावर सुटका झाल्याचे समाधान ग्राहकांना मिळाले.
पण तोपर्यंत कामाची दांडी, दगदग, मानसिक त्रास आणि प्रवासाचा खर्च हा भुर्दंड त्यांना सोसावा लागला. महावितरणच्या चुकीमुळे मीटर फॉल्टी होत आहेत. मात्र, तसे मीटर चेक करण्यासाठी ग्राहकांना फी भरावी लागते. तसेच मीटर फॉल्टी निघाल्यानंतर नवीन मीटर लावण्यासाठी टेस्टिंग फीही त्यांना द्यावी लागत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Shock to the flash meter customers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.