ढोल वाजूनही शोभायात्रा निरुत्साही
By Admin | Updated: March 29, 2017 05:49 IST2017-03-29T05:49:05+5:302017-03-29T05:49:05+5:30
गेल्या अनेक दिवसांपासून गुढीपाडव्याच्या स्वागतयात्रेत ढोल-ताशा तडतडणार किंवा कसे यावरून सुरू असलेल्या

ढोल वाजूनही शोभायात्रा निरुत्साही
ठाणे : गेल्या अनेक दिवसांपासून गुढीपाडव्याच्या स्वागतयात्रेत ढोल-ताशा तडतडणार किंवा कसे यावरून सुरू असलेल्या वादानंतरही अखेर ढोल निनादला. मात्र अनेक निर्बंधांमुळे ढोलाचा गजर माफक स्वरुपात, मात्र उत्साही गर्दीच्या साक्षीने झाला. परंतु ठाणेकरांचा रोडावलेला सहभाग आणि चित्ररथांची मर्यादित संख्या यामुळे स्वागतयात्रेचा नेहमीचा उत्साह यंदा जाणवला नाही.
पर्यावरणविषयक निर्बंध, आयोजकांचा जबाबदारी स्वीकारण्यास नकार आणि पोलिसांची अडेलतट्टू भूमिका यामुळे ढोल-ताशा पथकांचा सहभाग कमी होता. विष्णूनगर, चिंतामणी चौक आणि घंटाळी चौकात ढोलताशांचे वादन झाले. पथकांचे वादन पाहण्यासाठी ठाणेकरांनी तेथे गर्दी केली होती.
राम मारुती रोडवर दरवर्षी तरुणांचा जमाव असतो. यंदा या मार्गावर अत्यल्प प्रतिसाद होता. ऊन डोक्यावर येण्याच्या आत अनेकांनी स्वागतयात्रेतून काढता पाय घेतला. बघ्यांनी तर त्यापूर्वीच घराची वाट धरली होती. मार्ग बदलल्याने स्वागतयात्रा लवकर संपली. त्यामुळे यंदा स्वागतयात्रेत मजाच आली नसल्याची कुजबूज ठाणेकरांकडून ऐकायला मिळाली.
कडक उन्हामुळे सर्वच जण घामाघूम झाले होते. यात्रेत चित्ररथ मोठ्या प्रमाणात सहभागी होतील असा आयोजकाचां दावा होता. प्रत्यक्षात चित्ररथांचा कमी सहभाग दिसून आला. त्यातही जे चित्ररथ होते त्यात नाविन्य नसल्याने ठाणेकरांचा हिरमोड झाला. स्वागतयात्रेचा मार्ग बदलल्याने विष्णूनगर येथून आलेले मोठे चित्ररथ गोखले मार्गावर जाण्याकरिता वळण घेत असताना घंटाळी चौक येथे अडखळत होते. चित्ररथ वळवताना चालकाचे कौशल्य पणाला लागत होते. (प्रतिनिधी)