आठवले गटावरही शिवसेनेचा गळ
By Admin | Updated: January 26, 2017 03:13 IST2017-01-26T03:13:30+5:302017-01-26T03:13:30+5:30
शिवसेना-भाजपची युती संपुष्टात आल्यावर शिवसेनेने साई पक्षासोबतच आता रिपाइंच्या आठवले गटावरही युतीचा गळ टाकला आहे. साई पक्षासोबत

आठवले गटावरही शिवसेनेचा गळ
सदानंद नाईक / उल्हासनगर
शिवसेना-भाजपची युती संपुष्टात आल्यावर शिवसेनेने साई पक्षासोबतच आता रिपाइंच्या आठवले गटावरही युतीचा गळ टाकला आहे. साई पक्षासोबत गुरूवारी शिवसेनेची जागा वाटपाबाबत बैठक होणार आहे.
उल्हासनगरच्या महापालिका निवडणुकीत नैसर्गिक मित्र
असलेल्या शिवसेनेला डावलल्याने भाजपासह ओमी टीमला धडा शिकविण्यासाठी त्या पक्षाने कंबर कसली आहे. ‘शत्रुचा शत्रू’ हा आपला मित्र हा राजकीय डावपेच प्रत्यक्षात आणत शिवसेनेने साई पक्षासोबत युतीची बोलणी सुरू केली. त्यासाठी दोन्ही पक्षाची गुरूवारी बैठक होईल, असे साईचे जीवन इदनानी व शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी सांगितले.
शिवसेनेचा मराठी भागात, तर साई पक्षाची सिंधी परिसरात ताकद आहे. दोन्ही पक्षांना परस्परांचा फार फायदा होणार नसला, तरी एकत्रित संपूर्ण जागा लढविण्याचे समाधान या युतीला मिळेल. मराठीबहुल परिसरापैकी चोपडा कोर्ट, खेमानी परिसरातील भैय्यासाहेब आंबेडकरनगर, रमाबाई आंबेडकरनगर, डम्पिंग ग्राऊंड परिसर, सम्राट अशोकनगर, सुभाषटेकडी, गायकवाड पाडा, ओटी सेक्शन आदी परिसरात रिपाइंतील अनेक गटातटाचे वर्चस्व आहे. त्यामुळे शिवसेनेने एकीकडे साई पक्षासोबत युतीची बोलणी सुरू ठेवत रिपाइंच्या आठवले गटासह अनेक स्थानिक पक्ष नेते व इतर रिपाइंच्या गटाशी संपर्क ठेवल्याची माहिती चौधरी यांनी दिली.
रिपाइंच्या गटाशी भाजपाने आधी जागावाटप केले आहे. मात्र त्यातील काही जागा त्यांनी परस्पर ओमी कलानी यांच्या गटाला देऊ केल्याने हा आठवले गट नाराज आहे. त्यांना चुचकारून आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न आता शिवसेनेने सुरू केला आहे.