शिवसेनेचा घंटानाद यंदाही रस्त्यावरच
By Admin | Updated: September 26, 2015 00:53 IST2015-09-26T00:53:59+5:302015-09-26T00:53:59+5:30
बकरी ईद निमित्त हिंदूंना दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गा देवीच्या मंदिरात घंटानाद व आरती करण्यास पोलिसांचा बंदी हुकूम आहे.

शिवसेनेचा घंटानाद यंदाही रस्त्यावरच
कल्याण : बकरी ईद निमित्त हिंदूंना दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गा देवीच्या मंदिरात घंटानाद व आरती करण्यास पोलिसांचा बंदी हुकूम आहे. यंदाही ही बंदी मोडण्यासाठी शिवसैनिकांनी दुर्गाडीच्या दिशेने कूच केले. परंतु, प्रचंड पोलिस बंदोबस्तामुळे त्यांचे घंटानाद आंदोलन रस्त्यावरच पार पडले. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दीडशे आंदोलनकर्त्यांना अटक करून काही वेळाने त्यांची जामिनावर मुक्तता केली.
दुर्गाडी कि ल्ल्यावर हिंदू आणि मुस्लिम समाजाची धार्मिक स्थळे असून दोघांनीही आपले हक्क सांगितले आहेत. दरम्यान बकरी ईद च्या दिवशी दोघांमध्ये वाद होऊ नये तसेच कायदा-सुव्यवस्था बिघडू नये या अनुषंगाने हिंदूंना दुर्गाडी किल्ल्यावर आरती आणि घंटानाद करण्यास बंदी केली जाते. याचा निषेध म्हणून शिवसेनेकडून दरवर्षी घंटानाद आंदोलन केले जाते. याची सुरूवात ठाणे जिल्हा प्रमुख कै आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली झाली असून आजतागायत हे आंदोलन सुरू आहे. यंदादेखील ते छेडण्यात आले.
लालचौकात रोखले
पालकमंत्री शिंदे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या नेतृत्वाखाली महानगरप्रमुख विजय साळवी, शहरप्रमुख विश्वनाथ भोईर यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी दुर्गाडीच्या दिशेने कूच केले असता या आंदोलनकर्त्यांना लालचौकी परिसरातच रोखण्यात आले. प्रचंड पोलीस बंदोबस्तामुळे यंदाही शिवसैनिकांना रस्त्यावरच घंटानाद केल्याचे दिसून आले. आंदोलनकर्त्यांना अटक करून डोंबिवलीच्या मानपाडा पोलिस ठाण्यात आणले होते.