शिवसेनेच्या मल्लेश शेट्टींचे नगरसेवकपद रद्द
By Admin | Updated: March 25, 2016 00:55 IST2016-03-25T00:55:31+5:302016-03-25T00:55:31+5:30
अनधिकृत बांधकाम प्रकरणी कल्याण-डोंबिवली पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक मल्लेश शेट्टी यांचे नगरसेवकपद पालिका आयुक्त ई. रवींद्रन यांनी बुधवारी रद्द

शिवसेनेच्या मल्लेश शेट्टींचे नगरसेवकपद रद्द
कल्याण : अनधिकृत बांधकाम प्रकरणी कल्याण-डोंबिवली पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक मल्लेश शेट्टी यांचे नगरसेवकपद पालिका आयुक्त ई. रवींद्रन यांनी बुधवारी रद्द केले. कार्यालयाचे बांधकाम अनधिकृतपणे केल्याची त्यांच्याविरोधात तक्रार होती. त्याआधारे ही कारवाई झाली.
अनधिकृत बांधकामप्रकरणी कारवाई झालेले शेट्टी हे दुसरे नगरसेवक असून याआधी काँग्रेसचे नगरसेवक सचिन पोटे यांचे पद रद्द झाले होते.
शेट्टी यांच्या अनधिकृत बांधकामाची तक्रार सर्वप्रथम तक्रार माजी खासदार आनंद परांजपे यांनी केली होती. पालिकेने त्यांचे बांधकाम अनधिकृत म्हणून घोषितही केले होते. परंतु, पालिकेत युतीचीच सत्ता असल्याने कारवाई झाली नव्हती. लोकग्राम प्रभागातून शेट्टी या वेळच्या पालिका निवडणुकीत भाजपाचे उमेदवार नरेंद्र गुप्ते यांचा पराभव करून निवडून आले. त्यानंतर, गुप्ते यांनीही अनधिकृत बांधकामप्रकरणी शेट्टी यांचे पद रद्द करण्याची मागणी केली आणि मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर, सहा आठवड्यात कारवाईचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार, ही कारवाई झाली.
आयुक्त भाजपाच्या दबावाखाली काम करीत आहेत. त्यांना माझे नगरसेवकपद रद्द करण्याचा अधिकार नाही. माझ्यावर अन्याय झाला असून मी न्यायालयात दाद मागणार आहे.
- मल्लेश शेट्टी,
नगरसेवक, शिवसेना