शिवसेना करणार भाजपाची कोंडी
By Admin | Updated: April 20, 2017 04:07 IST2017-04-20T04:07:18+5:302017-04-20T04:07:18+5:30
महापालिकेत सत्तांतर होऊन भाजपा-ओमी टीम आणि साई पक्ष सत्तेत आल्यानंतर पहिली महासभा गुरूवारी होत असून सत्तेपासून दूर राहिलेली शिवसेना

शिवसेना करणार भाजपाची कोंडी
उल्हासनगर : महापालिकेत सत्तांतर होऊन भाजपा-ओमी टीम आणि साई पक्ष सत्तेत आल्यानंतर पहिली महासभा गुरूवारी होत असून सत्तेपासून दूर राहिलेली शिवसेना त्यात आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. पाणीटंचाई, कब्रस्तान, ग्राउंड, एमएसईबीच्या भूखंडावरून भाजपाला कोंडीत पकडण्याची तयारी त्यांनी केल्याने महासभा वादळी ठरेल, असे संकेत शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिले.
उल्हासनगरात आठवड्याला दोन ते तीन दिवस तोही अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक हैराण झाले आहे. झोपड्यांतील रहिवाशांना या टंचाईची सर्वाधिक झळ बसते आहे. प्रदूषित असूनही झोपडपट्टीतील नागरिक हातपंपाचे पाणी पिण्यासाठी वापरत आहेत. शिवसेनेचे बहुसंख्य नगरसेवक झोपडपट्टी असलेल्या परिसरातून निवडून आल्याने त्यांनी हा प्रश्न हाती घेत गेल्या आठवड्यात जिजामाता गार्डनसमोर उपोषण केले होते. आयुक्त सुधाकर शिंदे आणि महापौर मीना आयलानी यांच्या भेटीनंतर पाणी समस्या सोडविण्याचे आश्वासन मिळाल्याने त्यांनी उपोषण मागे घेतले होते.
मात्र हा प्रश्न अजूनही न सुटल्याचा, परिस्थिती आणखी बिघडल्याचा आरोप नगरसेवक सुनील सुर्वे, अरूण आशान, सुरेंद्र सावंत, शेखर यादव, मितिली चान्पुर, लिलाबाई आशान यांनी केला. महासभेत पाणीप्रश्नी प्रशासनाला जाब विचारून पाणी पुरवठ्याबाबत कृती आराखडा मागणार असल्याचे राजेंंद्र चौधरी यांनी सांगितले. तसेच व्हिटीसी मैदान, कब्रस्थानाचे हस्तांतर, वीज मंडळाला दिलेल्या भूखंडाचे हस्तांतर, अर्धवट कामे याबाबत जाब विचारला जाणार असल्याचे शिवसेनेने स्पष्ट केले. (प्रतिनिधी)