भाजपाची खिचडी शिवसेना करणार साफ
By Admin | Updated: January 26, 2017 03:14 IST2017-01-26T03:14:09+5:302017-01-26T03:14:09+5:30
मराठी शाळांबरोबर जिल्हा परिषदेच्या शाळा आणि आश्रमशाळांतील खिचडी साफ करण्याची वेळ आल्याचे सांगत दीर्घकाळ भाजपाच्या हाती

भाजपाची खिचडी शिवसेना करणार साफ
ठाणे : मराठी शाळांबरोबर जिल्हा परिषदेच्या शाळा आणि आश्रमशाळांतील खिचडी साफ करण्याची वेळ आल्याचे सांगत दीर्घकाळ भाजपाच्या हाती असलेला कोकण शिक्षक मतदारसंघ घेण्यास शिवसेना सज्ज झाल्याचा दावा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी केला.
कोकण विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेने प्रथमच आपला उमेदवार उभा केला असून ज्ञानेश्वर म्हात्रे हे पक्षातर्फे रिंगणात आहेत. त्यांच्या वचननाम्याचे प्रकाशन शिंदे यांच्या हस्ते झाले. या वेळी त्यांच्यासमवेत खासदार श्रीकांत शिंदे, आमदार बालाजी किणीकर, कल्याणचे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
शिक्षकांवर केवळ शिकवण्याची जबाबदारी असायला हवी, असे सांगत अन्य कामांना असलेल्या विरोधाचा शिक्षकांचा कळीचा मुद्दाही त्यांनी उचलून धरला. यासाठी आम्ही लढा देऊ आणि त्यात यश मिळवू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मराठी माध्यमातील शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या घटत आहे. हे चिंताजनक आहे. त्यासाठी ई क्लास, व्हर्च्युअल क्लास रुम, डिजिटल क्लास असे विविध उपक्रम राबवत तेथील विद्यार्थ्यांनाही शिक्षणाच्या जागतिक प्रवाहात आणण्यासाठी सरकार काम करत असल्याचे शिंदे यांनी निदर्शनास आणले.
रायगडमधील शेकापच्या उमेदवाराचा आम्हाला फटका बसणार नाही. आम्ही या निवडणुकीत शिक्षक नाही, तर मुख्याध्यापकाला उभे केल्याचे सांगत त्यांनी आमच्या उमेदवाराचा दर्जा वरचा असल्याचा टोला लगावला.
शिक्षक हा गुणवत्तापूर्ण समाजाचा आधारस्तंभ आहे. सुसंस्कृत समाज घडवण्याची जबाबदारी शिक्षकांच्या शिरावर असते. त्यामुळेच विद्यादानाचे कार्य आपल्या संस्कृतीत सर्वात महान मानले गेले आहे. पण त्या कामासाठीच शिक्षकांना पुरेसा वेळ मिळत नाही. अनेक कामांची जबाबदारी त्यांच्यावर असते. त्यांच्या अनेक समस्या असून सरकार त्या दूर करण्याचा आपल्या परीने प्रयत्न करत आहे.
नव्या पिढीला घडवण्याचे काम शिक्षक करत असतात. त्यामुळेच त्यांच्या समस्या तातडीने सोडवल्या गेल्या पाहिजेत, यावर त्यांनी भर दिला. शिक्षकांपुढे समायोजनाची टांगती तलवार आहे. विद्यार्थ्यांच्या तुलनेत शिक्षकांची संख्या अपुरी आहे. परंतु, शिक्षक भरतीवर बंदी आहे. (प्रतिनिधी)