ठाणे - आम्ही मर्द आहोत अशी घोषणा उद्धव ठाकरे करतात. जर तुम्ही मर्द असाल तर आमच्याविरोधात रस्त्यावर या, मुलीला भडकावून, माथी फिरवून अशी कृत्य करू नका. ती तुमच्या अंगलट येतील. तुम्ही मर्द असाल तर सामोरे या. लोकांच्या सहानुभूतीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू नका. स्वत: ठाण्याचे खासदार ठाण्याची बदनामी करत आहेत. त्यांना जनता मतदानातून जाब विचारेल. एका महिलेला पुढे करून काय लढतायेत. मर्द असाल तर समोर या. आम्हीदेखील शिवसैनिक आहोत. महिलांना प्यादे, हत्यार बनवून वापर करू नका. महिलेचा आधार कशासाठी घेता? असा घणाघात शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.
नरेश म्हस्के म्हणाले की, अतिशय बालिशपणे आणि चुकीच्या पद्धतीने कांगावा केला जात आहे. एका महिलेच्या खांद्यावर बंदूक ठेऊन सोशल मीडियावर सातत्याने ती महिला देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, भाजपा-शिवसेना नेते यांच्यावर सातत्याने घाणेरड्या भाषेत व्यक्त होते. भाजपा नेते चोर आहेत. डॉक्टर होण्यासाठी गद्दारी करावी लागते. एप्रिल फूल म्हणजे नरेंद्र मोदी. सर्वच नेत्यांवर लाच्छनांस्पद वक्तव्य ती वारंवार करत होती. महिलेच्या खांद्यावर बंदूक ठेऊन मातोश्री आणि खासदार राजन विचारे काम करतायेत असा आरोप त्यांनी केला.
तसेच कालच्या गोंधळात कुठलीही मारहाण झाली नाही. ती चालत स्वत: पोलीस स्टेशनला गेली. त्यानंतर प्लॅनिंगनुसार खासगी रुग्णालयात दाखल झाली. सरकारी दवाखान्याचा रिपोर्ट या महिलेला कुठेही अंतर्गत जखम नाही असा रिपोर्ट आला आहे. माध्यमांसमोर या लोकांचा खोटेपणा उघड झाला आहे. या महिलेची चाचणी केली असता ती गर्भवती नसल्याचे समोर आले. केवळ महिलेला जबरदस्तीने हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्याचा फायदा चांडाळ चौकडी करत आहेत असंही म्हस्के म्हणाले.
उद्धव ठाकरे तुमचं असत्य समोर आले उद्धव ठाकरे त्या महिलेला बघायला येतात. अजून किती लोकांना फसवणार आहात? तुम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोध करायचा असेल तर तुमच्या कामातून करा. अशाप्रकारे कुटनिती, फसवेगिरी करून एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांना फसवण्याचा प्रयत्न करू नका. सत्य हे सत्यच असते. असत्य कधी ना कधी उघडे पडते. तसे तुम्ही उघडे पडले आहात. राजन विचारे यांनी स्वत: रस्त्यावर आमचा सामना करावा. टीका करावी. एका महिलेच्या खांद्याचा आधार घेऊन या गोष्टी कशाला करतात असा सवाल नरेश म्हस्के यांनी विचारला आहे.
त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार रिपोर्ट हाती आल्यानंतर ज्यांनी आमच्यावर चुकीचे आरोप केलेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहोत. वारंवार, सातत्याने चुकीच्या पद्धतीने व्यक्त होणे, क्लेशदायक, निंदादायक आरोप करणे कितपत योग्य आहे? महिला म्हणून अधिकार आहेत तशी कर्तव्येदेखील आहेत. नेत्यांबद्दल काहीही लिहिणार, व्यक्तिगत लिहिणार, पॉलिसीवर टीका होऊ शकते. व्यक्तिगत टीका करण्याचा अधिकार नाही असं स्पष्टीकरण नरेश म्हस्के यांनी दिले.
जितेंद्र आव्हाड ठाण्यातील जोकरजितेंद्र आव्हाड हे ठाण्यातील विदुषक, जोकर आहेत. मध्येच उड्या मारतात, कोलांट्या उड्या मारतात तशी अवस्था आव्हाडांची झाली आहे. कार्टून आहेत. आव्हाडांनी जी ट्विट केली त्यावर आपले मत काय? सरकारी हॉस्पिटलवर आरोप करू शकता? ज्या हॉस्पिटलमध्ये उपचार त्यांनी माध्यमांसमोर माहिती दिली. आता आव्हाडांनी जोकरगिरी दाखवावी असा टोला नरेश म्हस्के यांनी लगावला.