शिवसेनेच्या नगरसेवकाला भाजपा आमदाराचा पाठिंबा
By Admin | Updated: April 1, 2016 02:57 IST2016-04-01T02:57:35+5:302016-04-01T02:57:35+5:30
शांतीनगरमधील ना-फेरीवाला क्षेत्रात ठाण मांडणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांवरील कारवाईसाठी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करून आणि पक्षातील वरिष्ठांना वेळोवेळी विनंती करूनही दाद

शिवसेनेच्या नगरसेवकाला भाजपा आमदाराचा पाठिंबा
भार्इंदर : शांतीनगरमधील ना-फेरीवाला क्षेत्रात ठाण मांडणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांवरील कारवाईसाठी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करून आणि पक्षातील वरिष्ठांना वेळोवेळी विनंती करूनही दाद न मिळाल्याने नाराज झालेले शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत दळवी सोमवारी पदाचा राजीनामा देणार आहेत. थेट पक्षनेतृत्वाला आव्हान देणाऱ्या या राजीनामानाट्यावरून शिवसेनेत अस्वस्थता खदखदत असतानाच भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता यांनी त्यांना उघडउघड पाठिंबा देत आयुक्त अच्युत हांगे यांच्या कारभाराविरोधात बिगुल फुंकले आहे आणि आपलेही नगरसेवकपद सोडत असल्याची घोषणा करत सेनेत एकाकी पडलेल्या दळवी यांना पाठीशी घातले आहे.
फेरीवाल्यांच्या प्रश्नावर महासभेत तब्बल आठ वेळा लक्षवेधी मांडल्यानंतर कारवाईचे आश्वासन प्रशासनाने दिले होते. तेही पोकळ ठरल्याने संतापलेल्या दळवी यांनी थेट राजीनाम्याचा पवित्रा घेतला. यासाठी पक्षाच्या वरिष्ठांकडूही सहकार्य न मिळाल्याचा दावा करत त्यांनी थेट ‘मातोश्री’चेच दार ठोठावल्याने पक्षात अस्वस्थता आहे. खासदार राजन विचारे यांनी आयुक्तांना खडे बोल सुनावेपर्यंत दळवी यांनी मेहता यांच्याकडे व्यथा मांडताच ते लगेच दळवी यांच्या पाठीशी उभे राहीले.