शिवसेना-भाजपाच्या नाराजांवर मनसेची भिस्त
By Admin | Updated: January 24, 2017 05:50 IST2017-01-24T05:50:53+5:302017-01-24T05:50:53+5:30
शिवसेना-भाजपा युतीच्या निर्णयावर मनसेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम होणार आहे. पक्षात चांगल्या उमेदवारांचे

शिवसेना-भाजपाच्या नाराजांवर मनसेची भिस्त
ठाणे : शिवसेना-भाजपा युतीच्या निर्णयावर मनसेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम होणार आहे. पक्षात चांगल्या उमेदवारांचे इनकमिंग होण्याची वाट पाहत पक्षाने मुलाखतीचा कार्यक्रम पुढे ढकलला आहे.
युती झाल्यास शिवसेना-भाजपामधून नाराज झालेले इच्छुक मनसेकडे मोर्चा वळवतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अशा बंडखोरांवर मनसे लक्ष ठेवून आहे. या नाराजांना पक्षात संधी देण्याच्या निर्णयावर मनसे ठाम आहे. युतीचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे. या निर्णयावर मनसेच्या मुलाखतींच्या तारखा अवलंबून आहेत. त्यामुळे मुलाखतींचा कार्यक्रम पक्षाने पुढे ढकलला आहे. या मुलाखतींच्या तारखा दोन ते तीन दिवसांत जाहीर होतील, असे पक्षाकडून सांगितले जात आहे. त्यामुळे मनसेमध्ये आलेले नवे इच्छुक उमेदवारही मुलाखतींच्या तारखांकडे डोळे लावून बसले आहे. मनसेमधून तिकीट मिळेल, या आशेवर काही इच्छुकांनी उमेदवारीचा अर्ज भरला होता. परंतु, मनसेच्या मुलाखतींचा कार्यक्रम जाहीर होत नसल्याने त्यांच्याही पोटात गोळा आला आहे.
इच्छुक उमेदवारांची यादी सोमवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे दिली असल्याचे ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितले. यादी गेली असली तरी चांगल्या उमेदवारांची वाट पक्ष बघत आहे, असे नेत्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)