शिवसेना-भाजपाला बंडोबांचे बालेकिल्ल्यात आव्हान
By Admin | Updated: February 6, 2017 04:43 IST2017-02-06T04:37:01+5:302017-02-06T04:43:25+5:30
ठाण्यात शिवसेना आणि भाजपामध्ये बंडखोरीची लागण झाली असून या बंडोबांना थंड करण्यासाठी दोन्ही पक्षांकडून आटापिटा सुरू झाला आहे.

शिवसेना-भाजपाला बंडोबांचे बालेकिल्ल्यात आव्हान
ठाणे : ठाण्यात शिवसेना आणि भाजपामध्ये बंडखोरीची लागण झाली असून या बंडोबांना थंड करण्यासाठी दोन्ही पक्षांकडून आटापिटा सुरू झाला आहे. असे असले तरी नौपाड्यात या बालेकिल्ल्यास शिवसेना आणि भाजपामध्ये अधिकची बंडखोरी झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांसमोर बंडखोरांनी मोठे आव्हान उभे केले आहे. उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या भाजपाच्या इच्छुकांनी अपक्षांचे पॅनल निवडणूक रिंगणात उतरवले आहे. शिवसेनेचे विभागप्रमुख, शाखाप्रमुखांमध्येही असंतोष असून ते सुद्धा रिंगणात उतरले आहेत.
ठाण्यातील नौपाड्याचा प्रभाग क्रमांक २१ हा शिवसेना आणि भाजपाला मानणारा प्रभाग म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी भाजपाचे एकतर शिवसेनेचे तीन नगरसेवक आहेत. मात्र, विधानसभा निवडणुकीत युती तुटल्यानंतर शिवसेनेपेक्षा भाजपाला या भागातून जास्त मतदान झाले होते. त्यामुळे या प्रभागातून उमेदवारी मिळवून नगरसेवक होण्याचे स्वप्न भाजपाच्या तब्बल ३८ जणांना पडले होते. मात्र, पक्षाने या प्रभागातून संजय वाघुले, सुनेश जोशी, मृणाल पेंडसे आणि प्रतिमा मढवी यांना उमेदवारी दिली आहे. या निवडीमुळे पक्षात कमालीचा असंतोष निर्माण झाला असून माजी उपमहापौर सुभाष काळे यांच्या नेतृत्वाखाली विद्यमान नगरसेविका सुहासिनी लोखंडे यांचे पती सुनील तसेच विशाखा कणकोसे यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. त्याशिवाय, डावलले गेलेल्या अन्य इच्छुकांमध्येसुद्धा कमालीचा असंतोष असून त्यांनीही पक्षाचे काम न करण्याचा निर्धार केला आहे. भाजपाच्या स्थानिक नेत्यांमध्येच एकवाक्यता नसल्यामुळे या बंडखोरांची समजूत काढणार कोण, असा सवाल निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांपुढे उभा ठाकला आहे. त्यातच तिकीटवाटपात नेतृत्वाने डावलल्याचा आरोप काळे यांनी केला आहे. त्यामुळे आता या ठिकाणी भाजपाविरोधात वातावरण अधिक पेटल्याचे चित्र आहे.
दुसरीकडे शिवसेनेचे या ठिकाणी तीन नगरसेवक असल्याने येथून आता अनेकांनी नगरसेवक होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, पक्षाने विलास सामंत, हिराकांत फर्डे आणि सुजाता पाटील या विद्यमान नगरसेवकांसह सीमा राजपूत यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या चारही शाखाप्रमुखांनी बंडखोरी केली असून अप्पा वेटे, राजश्री गजमल, चंद्रकांत टेंबे यांची मुलगी, सुरेश टेंबे यांची पत्नी, उपविभागप्रमुख संदीप झांबरे यांची पत्नी व राकेश साठे यांनी आपल्या आईला रिंगणात उतरवले आहे. विभागप्रमुख प्रकाश पायरे, बाळा गवस ही मंडळीसुद्धा नाराज आहे. नाराज शिवसैनिकांना जवळ करण्यासाठी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. सेना नेतेसुद्धा या असंतुष्टांना शांत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. (प्रतिनिधी)