भाजपशी युती केल्यास शिंदेसेनेपुढे आव्हान; उल्हासनगरमधील राजकीय समीकरणे बिघडणार?
By सदानंद नाईक | Updated: December 16, 2025 10:26 IST2025-12-16T10:25:31+5:302025-12-16T10:26:14+5:30
उल्हासनगर महापालिकेत भाजपच्या विरोधात शिंदेसेनेने ओमी कलानी टीम व साई पक्षाला सोबत घेऊन सर्वपक्षीय मोट बांधली होती.

भाजपशी युती केल्यास शिंदेसेनेपुढे आव्हान; उल्हासनगरमधील राजकीय समीकरणे बिघडणार?
सदानंद नाईक
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर महापालिकेत भाजपच्या विरोधात शिंदेसेनेने ओमी कलानी टीम व साई पक्षाला सोबत घेऊन सर्वपक्षीय मोट बांधली होती. महापालिका निवडणुकीत भाजप-शिंदेसेना यांच्यात युती झाली तर ओमी कलानी, साई पक्षाला आपल्या वाट्चातून शिंदेसेनेला जागा सोडाव्या लागतील. त्यामुळे भाजप-शिंदेसेनेची संभाव्य युती हे शिंदेसेनेपुढील मोठे आव्हान ठरण्याची शक्यता आहे. शिंदेसेनेनी जुळवलेले राजकीय समीकरण युतीच्या रेट्यामुळे विस्कळीत होणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
शिंदेसेना, ओमी कलानी व साई पक्षात जागावाटप सुरळीत झाले तर सत्तेकरिता या आघाडीशी भविष्यात भाजपला वाटाघाटी कराव्या लागतील. उल्हासनगरात २० प्रभागांत एकूण ७८ वॉर्ड असून १८ प्रभाग चार सदस्यांचे तर दोन प्रभाग तीन सदस्यांचे आहेत. सन-२०१७ साली भाजपने नैसर्गिक मित्र शिवसेनेसोबत युती न करता ओमी कलानी टीमसोबत हातमिळविणी केली होती. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, स्थानिक पक्ष साई व इतर पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढले होते.
२०१७चे पक्षीय बलाबल - ७८ नगरसेवक
भाजप, ओमी - ३३
शिवसेना - २५
साई पक्ष - ११
राष्ट्रवादी काँग्रेस - ४
आरपीआय - २
भारिप - १
पीआरपी - १
काँग्रेस - १
अडीच वर्षांनी भाजपची साथ सोडून ओमी कलानी यांचे समर्थक नगरसेवक बाहेर पडले व त्यांनी शिवसेना पक्षाला पाठिंबा दिल्याने, पुढील अडीच वर्षांसाठी शिवसेनेचा महापौर झाला..
काय शक्यता?
१. शिंदेसेना, ओमी कलानी टीम व स्थानिक साई पक्ष एकत्र आल्याने जागावाटपात शिंदेसेनेकडून जास्त जागांची मागणी होण्याची शक्यता.
२. राष्ट्रवादी काँग्रेस कलानी यांच्याभोवती राहिल्याने अजित पवार गट व शरद पवार गट नाममात्र.
३. रिपाइंचे विविध गट व वंचित बहुजन आघाडी यांच्यात एक-दोन वॉर्डात लढत.