शिंदे- चव्हाण यांच्यात तू तू- मैं मैं
By Admin | Updated: March 31, 2017 06:09 IST2017-03-31T06:09:04+5:302017-03-31T06:09:04+5:30
महापौरपदाची निवडणूक शिवसेना आणि भाजपाने प्रतिष्ठेची केली असून त्यावरूनच सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे आणि वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यात

शिंदे- चव्हाण यांच्यात तू तू- मैं मैं
उल्हासनगर : महापौरपदाची निवडणूक शिवसेना आणि भाजपाने प्रतिष्ठेची केली असून त्यावरूनच सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे आणि वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यात शाब्दिक चकमक झाली.
महापौर निवडणुकीकरिता अर्ज दाखल करण्याचा गुरुवार हा दिवस होता आणि सध्या शिंदे व चव्हाण हे शहरात ठाण मांडून बसले आहेत. साई पक्षाचे नगरसेवक शेरी व कांचन लुंड यांच्या घरी शिंदे यांची खलबते सुरू आहेत, तर नगरसेविका ज्योती चैनानी यांच्या घरी चव्हाण यांनी ठाण मांडले आहे. शिवसेनेने साई पक्षाच्या शेरी लुंड गटाला महापौरपदाची आॅफर देऊन भाजपासोबत गेलेल्या साई पक्षात फूट पाडण्याचे मनसुबे रचले होते. त्यामुळे भाजपाच्या गोटात खळबळ उडाली होती.
भाजपा साई पक्षाच्या पाठिंब्याने ४० नगरसेवकांचा जादुई आकडा पार करू शकते. मात्र, शिवसेनेने साई पक्षाला सुरुंग लावला आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार नगरसेवकांना सोबत घेतले. काँग्रेस, पीआरपी व भारिपाच्या प्रत्येकी एक नगरसेवकाचा पाठिंबा मिळवण्यात शिवसेनेला यश आले, अशी चर्चा आहे. साई पक्षाच्या फुटीमुळे हातातोंडाशी आलेले महापौरपद जाईल, या भीतीने राज्यमंत्री चव्हाण यांनी लुंड गटाच्या नगरसेवकांना वाटाघाटी करण्याकरिता चैनानी यांच्या घरी बोलावले होते. शिंदे यांना याची कुणकुण लागताच ते आपला ताफा घेऊन थेट चैनानी यांच्या घरात घुसले. चव्हाण व लुंड गटाचे नगरसेवक यांना चर्चा करताना पाहून त्यांचा पारा चढला. त्यांनी चव्हाण यांना फैलावर घेतले. साई पक्षाने भाजपाला पाठिंबा दिला असून त्यांच्या नगरसेवकांना तुम्ही ओलीस ठेवूनका, असे चव्हाण यांनी शिंदे यांना सुनावले, तर साई पक्ष कोणत्याही दडपणाखाली नाही, ते स्वत:हून महापौरपदाचा अर्ज दाखल करीत आहेत. मात्र, तुम्ही सत्तेचा गैरवापर करीत असल्याचे प्रत्युत्तर शिंदे यांनी चव्हाण यांना दिले. शिंदे यांना प्रारंभी चव्हाण यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिंदे आक्रमक राहिल्याने चव्हाण यांचाही आवाज चढला. यामुळे शिवसेना व भाजपातील तणाव वाढला आहे. (प्रतिनिधी)
शेरी लुंड व कांचन लुंड महापौरपदाचा अर्ज भरण्यासाठी येणार, असे शिवसेनेने गृहीत धरले होते. मात्र, ते चव्हाण यांच्यासोबत वाटाघाटी करीत बसल्याने येऊ शकले नाहीत. त्यामुळे शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी ज्योती माने यांचा महापौरपदासाठी, तर रिपाइंचे भगवान भालेराव यांचा उपमहापौरपदाकरिता अर्ज दाखल केला. भाजपाने महापौरपदासाठी मीना आयलानी यांचा, तर उपमहापौरपदासाठी साई पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी यांनी अर्ज दाखल केला.
चव्हाण यांच्या खेळीमुळे साई पक्षातील लुंड गटाचे नगरसेवक अर्ज भरण्यासाठी येऊ शकले नाहीत. मात्र, साई पक्षाच्या एका गटाला सोबत घेऊन महापौर शिवसेनेचाच होणार, असा दावा शिवसेना करीत असल्याने हा संघर्ष प्रत्यक्ष निवडणुकीपर्यंत तीव्र होणार आहे.
भाजपात वाद उफाळण्याची शक्यता
भाजपाचे शहराध्यक्ष कुमार आयलानी यांची पत्नी मीना आयलानी यांना महापौरपद देऊ नका, असा सूर पक्षाच्या एका गटासह ओमी कलानी यांनी पक्षाच्या वरिष्ठांकडे लावला होता. मात्र, आयलानी यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबतचे संबंध कामी आले आणि मीना आयलानी यांना उमेदवारी मिळाली. भाजपातील आयलानी विरोधी गट व ओमी कलानी गटात तूर्त स्मशानशांतता असली तरी ही नाराजी उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.