सेनेच्या यादीत शिंदेंचा वरचष्मा
By Admin | Updated: February 5, 2017 03:06 IST2017-02-05T03:06:14+5:302017-02-05T03:06:14+5:30
अखेर शिवसेनेची यादी जाहीर झाल्यानंतर बंडोबांना थोपवण्याचे प्रयत्न करूनही ते थंंड झालेले नाहीत. श्रेष्ठींनी आवाहन करूनही अनेकांनी बंडाचे निशाण कायम ठेवले असून पक्षाच्या
सेनेच्या यादीत शिंदेंचा वरचष्मा
ठाणे : अखेर शिवसेनेची यादी जाहीर झाल्यानंतर बंडोबांना थोपवण्याचे प्रयत्न करूनही ते थंंड झालेले नाहीत. श्रेष्ठींनी आवाहन करूनही अनेकांनी बंडाचे निशाण कायम ठेवले असून पक्षाच्या यादीवर पुन्हा एकदा एक्का शेठ अर्थात पालकमंत्री एकनाथ शिंदे ऊर्फ भाई यांचे वर्चस्व दिसून आले. दुसरीकडे तीन आमदारांनीही घरच्यांबरोबर काही जवळच्या पदाधिकाऱ्यांना तिकीट देऊन निष्ठावंतांची नाराजी ओढवून घेतली आहे. परंतु, राजन विचारे यांच्या समर्थकांचा पत्ता बहुतेक ठिकाणी कापल्याचे दिसत आहे.
या यादीत विद्यमान नगरसेवक पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात असून अनेक जण पुन्हा पाचव्या आणि सहाव्या वेळेस नशीब आजमावणार आहेत. त्यांची संख्या ५० टक्के आहे. सेनेने शुक्रवारी सायंकाळी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये जवळपास सर्वच वरिष्ठ नेत्यांच्या कुटुंबीयांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून पक्षातली घराणेशाहीची परंपरा कायम राखली आहे. जवळपास ६५ विद्यमान नगरसेवकांना पुन्हा तिकीट दिले आहेत. तर, खुल्या प्रवर्गातून उमेदवारी मिळू शकत नसलेल्या पक्षातल्या काही पदाधिकाऱ्यांच्या पत्नीला रिंगणात उतरवले आहे. दुसरीकडे १७ विद्यमान नगरसेवकांना मात्र या यादीत स्थान मिळालेले नाही. १३१ पैकी १२० जागांवर शिवसेनेने आपले मावळे उभे केले असून मुंब्य्रातील ११ जागांवर मात्र उमेदवार दिलेले नाहीत.
यादीवर नजर टाकल्यास यामध्ये पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे सर्वाधिक वर्चस्व दिसून आले. वागळे इस्टेट, किसननगर भागात त्यांच्या मर्जीतील उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तसेच देवराम भोईर अॅण्ड कंपनीही त्यांच्याच पठडीतील असल्याचे बोलले जाते. दुसरीकडे राम आणि विकास रेपाळे, शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे आदींना उमेदवारी मिळाली आहे. महापौर संजय मोरे यांची पत्नी आदींसह इतर मावळे हे शिंदे यांच्याच तालमीतील असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे आ. प्रताप सरनाईक यांनीदेखील पत्नी आणि मुलाला तिकीट मिळवले असून संदीप डोंगरे यांच्या पत्नीला तिकीट मिळवून देण्यात त्यांना यश आले आहे. तर, घोडबंदर भागातही त्यांनी काही पदाधिकाऱ्यांना तिकीट मिळवून दिले आहे. त्याखालोखाल विधान परिषदेचे आ. रवींद्र फाटक यांनीही पत्नी, वहिनी, तसेच आपल्यासोबत काँग्रेस सोडून शिवसेनेत दाखल झालेल्यांना तिकीट मिळवून दिले आहे. आमदार सुभाष भोईर यांनीदेखील आपल्या मुलाला तिकीट मिळवले आहे.
दरम्यान, खासदार राजन विचारे यांनी आपली पत्नी आणि घरच्यांना तिकीट मिळवले असून इतर पदाधिकाऱ्यांना मात्र नाराज केले आहे. त्यांच्या अनेक समर्थकांचे तिकीट कापण्यात आले आहे. त्यामुळे या नाराजांनी बंडाळी करून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये निष्ठावान विलास ढमाले, पूजा वाघ, बाळा घाग आणि त्यांच्या पत्नीने प्रभाग क्र मांक १७ मधून उमेदवारी दाखल केली आहे. माजी नगरसेवक मदन कदम यांनीदेखील पत्नी नीता कदम यांच्यासह चार उमेदवारांचे पॅनल तयार केले आहे. अश्विनी जगताप यांनी प्रभाग क्र मांक १८ आणि प्रभाग क्र मांक ३ मधून आनंद केसरे यांना पक्षाच्या एबी फॉर्म दिला नसताना त्यांनी आपला उमेदवारी अर्ज शिवसेना पक्ष म्हणून दाखल केला आहे. शिवसेनेचे वागळे उपविभागप्रमुख अजिनाथ वायकुळे यांनी प्रभाग १५ ब बंडखोरी करून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. (प्रतिनिधी)
शिवसेना उपशहरप्रमुखांचे पत्नीसह उपोषण
ठाणे महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २२ मध्ये शिवसेनेने उमेदवारी नाकारल्याने शिवसेना उपशहरप्रमुख विलास ढमाले व त्यांच्या पत्नी मंजिरी ढमाले यांनी शनिवारपासून टेंभीनाका येथील आनंद दिघे यांच्या पुतळ्याजवळ साखळी उपोषण सुरु केले आहे. तसेच या भागातील उमेदवारी दिलेल्या पवन कदम यांच्या घराला घेराव घालून उमेदवारी मागे न घेतल्यास राजीनाम्याचा इशारा दिला आहे.