सरकारच्या निषेधार्थ श्रमजीवींचा शिमगा मोर्चा
By Admin | Updated: March 22, 2017 01:14 IST2017-03-22T01:14:50+5:302017-03-22T01:14:50+5:30
आम्हाला मेट्रो, बुलेट ट्रेन नको तर आमची कुपोषित मुले वाचवण्यासाठी रेशनिंग दुकानवर मिळणारे तांदुळ, डाळी आदी ३५ किलो धान्य

सरकारच्या निषेधार्थ श्रमजीवींचा शिमगा मोर्चा
ठाणे : आम्हाला मेट्रो, बुलेट ट्रेन नको तर आमची कुपोषित मुले वाचवण्यासाठी रेशनिंग दुकानवर मिळणारे तांदुळ, डाळी आदी ३५ किलो धान्य, तेल हक्काने दर १५ दिवसात मिळावे, रोजगार हमीची कामे नियमित मिळावी आणि थकीत मजुरी वेळीच न मिळाल्यास ठाणे, पालघर जिल्ह्यातील सर्व तहसीलदार कार्यालय बंद करण्याचा इशारा श्रमजीवीचे संस्थापक अध्यक्ष विवेक पंडित यांनी राज्य शासनाला ‘शिमगा’ मोर्चाच्या प्रसंगी दिला.
सरकारच्या असंवेदनशील आणि निष्क्र ीय धोरणाविरोधात होळीच्या बोंबा मारून श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकारचा निषेध करणारा पण सांस्कृतिक दर्शन घडवणारा ‘शिमगा मोर्चा ’ मंगळवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला. नाच-गाणे करणारे, विविध सोंगांची मुखवटे घालून शहरातून हा मोर्चा काढला. सेंट्रल जेल, कोर्टनाका, टेंभीनाका या मार्गे येऊन त्याचे जांभळीनाका येथे जाहीर सभेत रु पांतर झाले. या मोर्चात ठाणे, पालघरसह नाशिक, रायगड येथील आदिवासी कार्यकर्ते मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते.
आमची ६०० मुले या सरकारच्या काळात दगावली आहेत. त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न न करता निर्लज्ज सरकार मेट्रो, बुलेट ट्रेनची भाषा करीत आहे. खायला अन्न नाही, अंगावर कपडे नाहीत, रोजगार नाही असे असतानाही शासन त्यासाठी काही करीत नाही. आमचा हा हक्क आम्हाला मिळावा. पालघर जिल्ह्यातील कुपोषणाचे गांभीर्य जगात पोहचले. मात्र, सरकारकडून काहीही हालचाली झाल्या नाहीत. असाही आरोप करण्यात आला. (वार्ताहर)