सेना पदाधिकाऱ्यांची ढाल
By Admin | Updated: January 25, 2017 04:48 IST2017-01-25T04:48:09+5:302017-01-25T04:48:09+5:30
येथील उत्तन-गोराई सीमेवर असलेल्या सावंतवाडी गावातील शेतकरी असलेल्या सावंत कुटुंबाने थेट ग्राहकांना स्वस्त दरात शेतमाल विकण्यास भार्इंदर पश्चिमेकडील बाजारात

सेना पदाधिकाऱ्यांची ढाल
भार्इंदर : येथील उत्तन-गोराई सीमेवर असलेल्या सावंतवाडी गावातील शेतकरी असलेल्या सावंत कुटुंबाने थेट ग्राहकांना स्वस्त दरात शेतमाल विकण्यास भार्इंदर पश्चिमेकडील बाजारात ११ जानेवारीपासून सुरुवात केली. त्याची हातगाडी येथील शिवसेना शाखेजवळ लावल्याने शिवसेनेचे माजी शहरप्रमुख गजेंद्र रकवी यांनी त्याला विरोध केला. हे वृत्त २४ जानेवारीच्या ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच सेनेच्याच काही पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने त्या शेतकऱ्याने पुन्हा भाजी विक्री सुरु केली. यावेळी मात्र विक्रीचे ठिकाण बदलले आहे. सावंत कुटुंबाने पडीक जमिनीवर भागीदारीत पुन्हा भाजीपाल्याची शेती करण्यास सुरूवात केली. त्यातील शेतमाल सुरुवातीला किरकोळ विक्रेत्यांना घाऊक प्रमाणात विकण्याचा निर्णय सावंत कुटुंबाने घेतला. त्याला अत्यल्प दर मिळू लागल्याने त्यांनी भागीदार अनिल नौटियाल यांच्या सहकार्याने भार्इंदर पश्चिमेकडील भाजी बाजारात रास्त दरात भाजी विकण्यास सुरुवात केली. सुरुवातीला भाजीपाला विक्रीची हातगाडी एका जुन्या क्रॉसजवळ लावण्यात येत होती. त्याला काहींनी विरोध केल्याने ती जवळच्या शिवसेना शाखेजवळ लावण्यात आली. त्यावेळी सावंत यांना सिराज अहमद हसनअली सिद्दीकी या स्थानिकाला माल विक्रीसाठी सहकार्य करण्याची विनंती केली. त्यानुसार भाजीपाला विक्री होत असतानाच रकवी यांनी सावंत यांना कुणाला विचारून हातगाडी लावली असा सवाल केला. शाखेसमोरील पादचारी मार्गावर पालिकेच्या वरदहस्ताने ठाण मांडणाऱ्या महिलांच्या भाजीपाला विक्रीवर परिणाम होत असल्याचे कारण रकवी यांनी पुढे केले. हा वाद सुरु असतानाच त्या भाजीविक्रेत्या महिलांनी सिद्दीकी याला धक्काबुक्की करत सावंत यांचा भाजीपाला फेकून दिला.
याप्रकरणी भार्इंदर पोलिसांत सिद्दीकी व त्या भाजीविक्रेत्या महिलांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध करण्यात आले. दरम्यान, सेनेतील गटबाजी उघड झाली. एका गटाने त्या शेतकऱ्याला शाखेजवळच हातगाडी लावण्यास सहकार्य केले होते. रकवी यांना ते न पटल्यानेच हा प्रकार घडल्याचे बोलले जात असले तरी सेनेत गटबाजी नसल्याचा दावा केला जात आहे. (प्रतिनिधी)