Sharad Pawar's attention to Thane district for upcoming Vidhan Sabha elections | आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांचे ठाणे जिल्ह्यावर लक्ष! 
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांचे ठाणे जिल्ह्यावर लक्ष! 

ठाणे : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसची ठाणे जिल्ह्यातील कामगिरी सुधारण्यासाठी पक्षाध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी स्वतः लक्ष देण्याचे ठरविले आहे. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी मंगळवारी शरद पवार यांची भेट घेऊन जिल्ह्यातील पक्षाच्या राजकीय स्थितीची माहिती घेतली. त्यानंतर शनिवारी आढावा बैठक घेण्यात येणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीत पक्षाने ठाणे व कल्याण जागा लढविल्या होत्या. तर ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चार आमदार आहेत. मात्र, कळवा-मुंब्रा वगळता उल्हासनगर, ऐरोली आणि शहापूरमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसची पिछेहाट झाली होती. भिवंडी मतदारसंघातील कॉंग्रेसच्या उमेदवारालाही पराभव पत्करावा लागला होता. या पार्श्वभूमीवर प्रदेश उपाध्यक्ष व ज्येष्ठ नेते प्रमोद हिंदूराव यांनी पवार यांची मुंबईत भेट घेतली. त्यावेळी प्रमोद हिंदूराव यांनी ठाणे जिल्ह्यातील पक्षाच्या स्थितीकडे पक्षाध्यक्षांचे लक्ष वेधले. तसेच पक्षाची कामगिरी सुधारण्यासाठी साकडे घातले. त्यावेळी पवार यांनी आपण विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यावर स्वतः लक्ष देणार असल्याचे जाहीर केले.

ठाणे जिल्ह्यात विधानसभेच्या 18 जागा असून, आगामी निवडणुकीत सर्वच्या सर्व 18 जागांवर लक्ष केंद्रीत करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यात मोठे यश मिळविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून प्रयत्न केले जाणार आहेत. या संदर्भात येत्या शनिवारी (1 जून) मुंबईत बैठक होणार आहे. त्यात पक्षाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनेबाबत प्राथमिक चर्चा केली जाणार आहे. तसेच जिल्ह्यातील पक्षाच्या स्थितीचा आढावा घेतला जाईल, अशी माहिती प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी दिली.


Web Title: Sharad Pawar's attention to Thane district for upcoming Vidhan Sabha elections
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.