शहापूरचे ‘पाणी पेटले’
By Admin | Updated: April 25, 2017 00:03 IST2017-04-25T00:03:56+5:302017-04-25T00:03:56+5:30
मागील वर्षी तुलनेने अधिक पाऊस झाला असताना उन्हाळा सुरू होताच शहापूर तालुक्यातील अनेक गावपाड्यांना पाणीप्रश्नाने घेरले आहे.

शहापूरचे ‘पाणी पेटले’
ठाणे : मागील वर्षी तुलनेने अधिक पाऊस झाला असताना उन्हाळा सुरू होताच शहापूर तालुक्यातील अनेक गावपाड्यांना पाणीप्रश्नाने घेरले आहे. तालुक्याला २५ टँकरची आवश्यकता असताना केवळ १० टँकरनेच पाणीपुरवठा होत असल्याची बाब सोमवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात झालेल्या जि.प.च्या आढावा बैठकीत उघड झाली. अत्यल्प प्रमाणात उपलब्ध झालेल्या टँकरमुळे येथील नागरिकांवर गढूळ पाणी पिण्याची वेळ आल्याचेही या वेळी निदर्शनास आले. या गढूळ पाण्याची बाटली बरोरा यांनी जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांना दिली.
वर्षभरात केलेल्या व अर्धवट राहिलेल्या विविध विकासकामांचा जिल्हानिहाय आढावा घेण्याची पद्धत भाजपा सरकारने नुकतीच सुरू केली आहे. आर्थिक वर्ष संपताच राज्यातील जिल्हा परिषदांच्या विकासकामांचा आढावा मंत्री, राज्यमंत्र्यांद्वारे घेतला जात आहे. त्यानुसार, ग्रामविकासमंत्री दादासाहेब भुसे आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही झाडाझडती घेतली. या वेळी राबवण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पेय जलयोजनेची माहिती घेण्यात आली. आमदार पांडुरंग बरोरा यांनी शहापूर तालुक्यात मागणीपेक्षा कमी प्रमाणात टँकरने पाणीपुरवठा होत असल्याचे सांगितले. तालुक्याला २५ टँकरची गरज असताना केवळ १० टँकरने तो करण्यात येत असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली. दरवर्षी शहापूर तालुक्यात मार्च महिन्यापासून खर्डी, कसारा, वाशाळा व तालुक्याच्या इतर भागांत पाणीटंचाई सुरू होते. महिनाभरापूर्वीच या टंचाई भागात पाणी टँकर सुरू करावेत, अशी मागणी करूनसुद्धा टँकर सुरू न झाल्याने तुकाराम आगिवले याचा आठ किमीवरून पाणी आणण्यासाठी गेला असता दुर्दैवी अंत झाला असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. जिल्हा प्रशासनाकडे १५ टँकरचा प्रस्ताव अजूनही प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, अत्यल्प प्रमाणात टँकरने होत असलेल्या पाणीपुरवठ्यामुळे येथील नागरिकांवर गढूळ पाणी पिण्याची वेळ आली असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.
शहापूर तालुक्यातील अनेक गावपाड्यांमध्ये अत्यल्प प्रमाणात टँकरने होत असलेल्या पाणी पुरवठ्यामुळे येथील नागरिकांवर गढूळ पाणी पिण्याची वेळ आली आहे. त्यामुळे हेच गढूळ पाणी बाटलीत भरून बरोरा यांनी या वेळी आणले होते. (प्रतिनिधी)