शहापूर : भारंगी नदीच्या संवर्धनासाठी शहापूरकर एकवटले असून रोटरी क्लबचे अध्यक्ष कमलेश कुंदर यांनी २५ हजार आणि शिवसेनेचे उपजिल्हा संपर्कप्रमुख संतोष शिंदे यांनी ११ हजारांची मदत दिली. शहापूरकरांनीही नदीच्या संवर्धनासाठी सहभाग दाखविला आहे. शहापूर येथे माहुली किल्ल्याच्या पायथ्यावरून उगम पावलेली भारंगी नदी शहापूर शहराच्या सौंदर्यात भर पाडत असते. पण, गेल्या काही काळापासून घनकचरा आणि सांडपाणी नदीत सोडले जात असल्यामुळे नदीत गाळ साचला आहे.
या नदीचे संवर्धन करून सौंदर्य राखले जावे, त्यासाठी वसुंधरा संवर्धन मंडळाच्या माध्यमातून शिंदे यांनी पुढाकार घेऊन शनिवारी एक सभा घेतली. सभेला विविध पक्षांतील कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. लोकसहभागातून भारंगी नदी सुशोभीकरण कार्यक्रम हाती घेण्याचे ठरवण्यात आले. वाढते नागरिकीकरण आणि भकास बनत चाललेल्या शहापूर शहरात सांडपाणी व्यवस्था करण्यासाठी तसेच डम्पिंग ग्राउंड नसल्याने नदीपात्रात शहापूर शहर आणि बाजूच्या ग्रामपंचायतीचे सांडपाणी सोडले जाते. कचरा टाकला जात असल्याने नदीच्या पात्राचे नाल्यात रूपांतर झाले आहे.
कुंदर यांनी दिलेल्या माहितीनुसार भारंगी नदीत दरवर्षी १२६ अब्ज लीटर पाणीसाठा असतो. त्यातील ६८ अब्ज लीटर पाणी वाहून जाते. नदीची खोली वाढवली तर माेठा पाणीसाठा शिल्लक राहू शकतो. त्यामुळे भूजलपातळी वाढून शहापूर शहर व परिसरातील बोअरवेल, विहिरींना त्याचा फायदा होऊ शकतो. शहरातील व परिसरातील पाणीपुरवठ्याची समस्या सुटू शकते.
वसुंधरा संवर्धन मंडळाचे आनंद भागवत यांनी या मोहिमेत आपण सक्रिय सहभाग घेणार असल्याचे सांगून तालुक्यातील इतर धरणे आणि पाणीसाठा असलेल्या नद्यांच्या संवर्धनासाठी काय केले पाहिजे, याबाबत मार्गदर्शन केले. या मोहिमेची जबाबदारी शिंदे यांनी घेतली असून पुढील काळात एक समिती नेमण्यात येणार आहे.
सभेसाठी माजी आमदार पांडुरंग बरोरा, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शंकर खाडे, आनंद भागवत, गोविंद व्यास, संतोष शिंदे, अरुण कासार, अपर्णा खाडे, अजित आळशी, कमलेश कुंदर, सुभाष विशे, गौतम गोडे, सुमेध जाधव, अविनाश भालेराव, अजित पोतदार तसेच व्यापारी मंडळाचे प्रकाश शाह, नागरिक उपस्थित होते.