शहापूर तालुक्याच्या आठवडी बाजारात खरेदीसाठी झुंबड; नागरिक बेफिकीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 02:01 IST2021-03-22T02:01:40+5:302021-03-22T02:01:58+5:30
आदिवासी परिसरातही कोरोना पसरु लागला हातपाय

शहापूर तालुक्याच्या आठवडी बाजारात खरेदीसाठी झुंबड; नागरिक बेफिकीर
जनार्दन भेरे
भातसानगर : शहापूर तालुक्यात कोरोनाची जणू कुणाला भीतीच राहिली नसल्याचे सध्याच्या परिस्थितीवरून दिसत आहे. सरकारने काही निर्बंध घातले असले तरी याची कुठेही काटेकोरपणे अंमलबजावणी होताना दिसत नाही. लॉनवर होणारी लग्न गेल्या काही दिवसापासून बंद असली तरीसुद्धा घराजवळची लग्न मात्र मोठ्या थाटामाटात, गर्दीत होत आहेत. जणू काही आपल्याला कोरोना होणारच नाही अशा रुबाबात मंडळी पाहावयास मिळतात. मागील काळात आदिवासींपासून दूर असलेला कोरोना आता पाय पसरू लागला आहे. त्यातच आदिवासी समाजातही लग्नकार्यात तसेच अंत्यसंस्काराच्या वेळी मोठ्या प्रमाणावर नागरिक गर्दी करीत आहेत.
आम्ही सकाळपासून उन्हात असतो त्यामुळे आम्हाला कोरोना होणार नाही असा त्यांना विश्वास आहे. मात्र आज तालुक्यामध्ये कोरोनासाठी लग्न समारंभ, आठवडी बाजार, बस्थानक व बससाठी होणारी गर्दी कोरोनासाठी पोषक वातावरण निर्माण होण्यास हातभार लागत आहे. मागील महिन्यात केवळ एक ते दोन रुग्ण सापडत असताना आता ही संख्या २५ च्या वर जात असल्याने ही धोक्याची घंटा नसेल कशावरून? कोरोनात आतापर्यंत १२६ जणांचे मृत्यू झाले आहेत. अशीच परिस्थिती राहिल्यास तालुक्यामध्ये येत्या काही दिवसात गंभीर चित्र निर्माण होऊ शकते. कोरोना खेड्यापाड्यांमध्ये पोहोचला असून या रुग्णांच्या संपर्कात येणारे अनेक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे तालुक्यामध्ये होणारे लग्नसमारंभ, आठवडीबाजार, वाढदिवस,अंत्यसंस्काराच्या वेळी होणारी गर्दी. मास्क न वापरता होणारा नागरिकांचा संचार. आठवडी बाजार यावर कुणाचेही नियंत्रण नसल्याचे सध्यातरी दिसत आहेत.
शहापूर ,डोळखांब, अघई, शेणवा, कसारा, वासिंदसारख्या मुख्य बाजारपेठा तालुक्यांमध्ये आहेत. येथे आठवडी बाजार भरतात. तालुक्यात नाट्यगृह नसल्याने ही भर इतर कार्यक्रमात भरून निघते. तालुक्यामध्ये आज ना उद्या लॉकडाऊन होईल अशा प्रकारच्या वावड्या उठत असल्याने या आठवडी बाजारमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक गर्दी करत आहेत. नागरिकांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. जर नियमांचे पालन केले नाही तर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो अशी भीतीही व्यक्त केली आहे.
शहापूर तालुक्यात अनेक समारंभ जोरात सुरू असून नागरिक अजिबात या आजाराबद्दल हवे तितके जागृत आहेत असे वाटत नाही. त्यासाठी त्यांनी आताच काळजी घेणे आवश्यक आहे. - जयराम भोईर, सामाजिक कार्यकर्ते.