ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुका तीव्र पाणी टंचाईने त्रस्त; ४० गावखेड्यांना १३ टँकरने पाणी पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 18:23 IST2018-04-13T18:23:01+5:302018-04-13T18:23:01+5:30
यंदा ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुका तीव्र पाणी टंचाईने त्रस्त; ४० गावखेड्यांना १३ टँकरने पाणी पुरवठा होत आहे. जिल्ह्यातील सुमारे १२१ मोठी गावे व ३२७ पाड्यांना टंचाईला तोंड द्यावे लागणार असल्याचा आंदाज आहे. त्यावर मात करण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, यांनी सुमारे सहा कोटी ५० लाख रूपयांच्या खर्चास मंजुरीही देखील दिली आहे. त्यात शहापूरचे ७८ गावे, १९० पाड्यांना पाणी टंचाई असून त्यातील ५३ गावांसह १४१ पाड्यांना टँकरने पाणी पुरवठा होणार आहे. त्यासाठी ९० लाखांची तरतूद आहे. तर पाणी पुरवठ्याच्या अन्य कामांसाठी शहापूर तालुक्याला चार कोटी ११ लाखांच्या निधीची तजवीज करण्यात आली आहे.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुका तीव्र पाणी टंचाईने त्रस्त; ४० गावखेड्यांना १३ टँकरने पाणी पुरवठा
ठाणे : जिल्ह्यातील सहा महापालिका, दोन नगरपालिकांना, याशिवाय मुंबईला मुबलक पाणी पुरवठा करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात तीव्र पाणी टंचाई आहे. सुमारे दहा गांवे ३० पाडे आदी ४० गावखेड्यांमध्ये तीव्र पाणी टंचाई असून त्यांना १३ टँकरव्दारे पाणी पुरवठा होत असल्याची सरकारी आकडेवारी आहे. परंतु संपूर्ण दुर्गमभाग असलेल्या या शहापूर तालुक्यातील ७८ गावे आणि १९० पाड्यांमध्ये कमी अधिकप्रमाणात पाणी टंचाई सुरू असल्याचे स्थानिकांकडून उघडकीस येत आहे.
यंदा जिल्ह्यातील शहापूरसह मुरबाड, भिवंडी आणि अंबरनाथ तालुक्यातील काही गावपाडे पाणी टंचाईला तोंड देत आहेत. या टंचाईची चाहूल लागताच लोकमतने ‘४४८ पाड्यांना पाणी टंचाई ‘ या मथळ्याखाली ५ मार्चला वृत्त प्रसिध्द करून प्रशासनास जागृत केले आहे. याची त्वरीत दखल घेऊन जिल्हाप्रशासनाने १६ मार्चला कोळीपाड्यासाठी पहिला टँकर सुरू केल्याचे निदर्शनात आले. भिवंडी, मुरबाड तालुक्यातील पाणी टंचाईची प्रशासनाने अद्याप दखल घेतली नाही. मात्र शहापूरच्या १० मोठ्या गावांसह ३० आदिवासी पाड्यांच्या तीव्र टंचाईने प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यावर वेळीच उपाययोजना म्हणून १३ टँकरव्दारे २४ तास पाणी पुरवठा सुरू आहे. शहापूरमधील अजनूप, गोलभण, दाड, जरडी, उम्रावण, कळभोंडे, विहीगांव, माळ, पाटोळ आणि घाणेपाडा या दहा मोठ्यांनासह ३० पाडे पाणी टंचाईला तोंड देत आहेत. यामध्ये कोळीपाड, बिवळवाडी, नारळवाडी, पारधवाडी, आंब्याचापाडा, बोरीचापाड, पेट्याचापाडा,ओहळाचीवाडी, वरातेपाडा, कडूपाडा, भाकरेपाडा, चाफ्याचापाडा, वडपाडा, वडाचापाडा, काटीपाडा, नवीनवाडी, सावरवाडी,मेंगाळपाडा, भस्मेपाडा, चिंतामणवाडी, बोंडारपाडा, ठाकूरपाडा,जांभूळपाडा, राईचीवाडी, काळीपाडा, कुंभईवाडी, सुगाव आणि वारलीपाडा या दुर्गमभागातील गावखेडे तीव्र टंचाईला तोंड देत आहेत. त्यावरील उपाययोजना म्हणून ३० टँकर या ४० गावखे्यांना रात्रंदिवस पाणी पुरवठा करीत आहेत. काही ठिकाणी गावकरी टँकरवर पाणी भरत आहेत. तर काही ठिकाणी विहिरींमध्ये टँकरचे पाणी सोडले जात आहे. त्यातून महिला वर्ग पाणी काढून कुटुंबाची तहाण भागवत असल्याचे वास्तव शहापूर तालुक्यात आहे. मागील वर्षी या शहापूरच्या १६ गावांसह ५८ आदिवासी पाड्यांना १८ टँकरव्दारे पाणी पुरवठा करण्यात आला. यंदा मात्र ही संख्या वाढण्याचे चिन्ह दिसत आहे.