शहापूर पंचायत समिती कर्मचाऱ्यांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:54 IST2021-02-27T04:54:36+5:302021-02-27T04:54:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहापूर : शासकीय निवासस्थान दुरुस्तीच्या कामात अडथळा निर्माण करून शाखा अभियंता व सहायक यांना शिवीगाळ व ...

शहापूर पंचायत समिती कर्मचाऱ्यांना मारहाण
लोकमत न्यूज नेटवर्क
शहापूर : शासकीय निवासस्थान दुरुस्तीच्या कामात अडथळा निर्माण करून शाखा अभियंता व सहायक यांना शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना गुरुवारी शहापुरात घडली. याप्रकरणी शुक्रवारी शहापूर पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
शहापूर पंचायत समितीच्या आवारातील पाणी तपासणी लॅब तसेच सभापती, उपसभापती, शिपाई व इतर कर्मचाऱ्यांची निवासस्थाने अनेक वर्षे जीर्ण झाली आहेत. त्यामुळे या निवासस्थानांच्या दुरुस्तीचे काम शासनाच्या आदेशानुसार सुरू आहेत; मात्र पंचायत समितीच्या निवासस्थानाच्या जमिनीचा वाद जमीनमालक अशोक गायकवाड यांच्याशी अनेक वर्षांपासून सुरू आहे. असे असताना निवासस्थानांची दुरुस्ती सुरू केल्याचा जाब विचारण्यासाठी गायकवाड यांनी पंचायत समितीचा बांधकाम विभागात जाऊन शाखा अभियंता अनिल दिवाण व त्यांचे सहायक वसंत निरगुडे यांना शिवीगाळ व दांडक्याने मारहाण केली, तसेच संगणक व कार्यालयाची, गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनातील टेबलवरील काच फोडली, अशी तक्रार निरगुडे यांनी शहापूर पोलिसात केली आहे. याप्रकरणी गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे.
पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी काम बंद आंदोलन करून या घटनेचा निषेध व्यक्त केला. उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, संकेत देऊळकर, पोलीस निरीक्षक घनश्याम आढाव यांच्या मध्यस्तीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, पंचायत समितीच्या कार्यालयात गायकवाड यांनी मलाही धक्काबुक्की झाल्याची तक्रार संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विरोधात पोलिसांत दिली आहे.
मारहाणीचा प्रकार निषेधार्ह
यासंदर्भात गटविकास अधिकारी हनुमंतराव दोडके म्हणाले की, पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांना मारण्याचा जो प्रकार झाला तो निषेधार्ह आहे. कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले होते; परंतु कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्याचे पोलिसांनी मान्य करताच काम बंद आंदोलन स्थगित करून फक्त काळ्या फिती लावून आंदोलन सुरू करण्यात आले आहे.