पंडित मसणे, लोकमत न्यूज नेटवर्क, वासिंद: उन्हाच्या चटक्याबरोबरच शहापूरमधील नागरिकांना पाणीटंचाईचे चटकेही सोसावे लागत आहेत. मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या शहापूर तालुक्यात पाणी टंचाईच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत. शहापूर तालुक्यातील आठ गावे आणि ४५ पाडे आजही पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. या गावपाड्यांतील महिलांना शेकडो किलोमीटर डोक्यावरूनच पाणी आणून तहान भागावावी लागत आहेत.
धरणांचा ताल शहापूर तालुक्यातील दरवर्षी फेब्रुवारी ते जूनपर्यंत मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जाणवते. तालुक्यातील गाव-पाड्यांत निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईची समस्या सुटावी, यासाठी पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने यापूर्वी पाणीटंचाई आराखडा तयार करून मंजुरीसाठी प्रस्तावित केला आहे. त्यानुसार पाणी टंचाईवर उपाय योजना केल्या जात आहेत.
दरवर्षीचे रडगाणे
दरवर्षी अनेक गाव-पाड्यांत टंचाई जाणवते. या निर्माण होणाऱ्या टंचाईच्या समस्येसाठी सरकारी पातळीवर विविध उपाययोजना आखून पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. २०२४-२५ या वर्षासाठी संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार करून प्रस्तावित केला. यंदा तालुक्यात जानेवारी ते जूनदरम्यान ३०६ गावे व ५६३ पाडे, असे एकूण ८६९ गाव-पाड्यांत टंचाई जाणवत आहे.
तालुक्यात ३३ टँकरची मागणी
ही टंचाईची समस्या सोडविण्यासाठी या गाव-पाड्यांत सरकारी पातळीवरून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. पाणीटंचाई म्हणून मंजुरीसाठी प्रस्तावित असलेल्या २४ गावे व ११६ पाडे यासाठी एकूण ३३ टँकरची मागणी असून, या अनुषंगाने सध्या मिळालेल्या मंजुरीनुसार तालुक्यातील १६ गावे, ७१ पाड्यांना २९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केल्याची माहिती गायकवाड यांनी दिली, तर पंचायत समिती स्तरावर दोन गावे व आठ पाड्यांसाठी दोन टँकर प्रस्तावित आहेत.
पंधरा कोटींचा आराखड्यावर खर्च
जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा शहापूर उपविभागांनी विविध योजनांच्या माध्यमातून कृती आराखडा तयार करून मंजुरीसाठी पाठविला आहे. यामध्ये टँकर व बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करण्याबरोबर बुडक्या घेणे, गाळ काढून विहीर खोल करणे, विहीर अधिग्रहण व प्रगतिपथावरील नळ पाणीपुरवठा योजना करणे.नळ पाणीपुरवठा योजना विशेष दुरुस्ती, पूरक नळ पाणीपुरवठा योजना करून विंधन विहिरी घेणे व विहिरीची दुरुस्ती करणे, या विविध उपाययोजनांचा आराखड्यात समावेश केला आहे, तर या प्रस्तावित योजनाकामी १५ कोटी ४७ लाख ७० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.