शॅगीने अटकेपूर्वीच पाठवले कोट्यवधी रुपये विदेशात
By Admin | Updated: April 21, 2017 03:21 IST2017-04-21T03:21:52+5:302017-04-21T03:21:52+5:30
कॉल सेंटर प्रकरणाचा सूत्रधार सागर ठक्कर ऊर्फ शॅगी याने अटकेपूर्वीच कोट्यवधी रुपये विदेशात पाठवल्याची माहिती पोलिसांना त्याच्या चौकशीदरम्यान मिळाली आहे.

शॅगीने अटकेपूर्वीच पाठवले कोट्यवधी रुपये विदेशात
ठाणे : कॉल सेंटर प्रकरणाचा सूत्रधार सागर ठक्कर ऊर्फ शॅगी याने अटकेपूर्वीच कोट्यवधी रुपये विदेशात पाठवल्याची माहिती पोलिसांना त्याच्या चौकशीदरम्यान मिळाली आहे.
करवसुलीच्या नावाखाली अमेरिकन नागरिकांकडून खंडणी उकळणाऱ्या मीरा रोडमधील बोगस कॉल सेंटर प्रकरणाचा सूत्रधार शॅगी गेले ११ दिवस गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस कोठडीत होता. यादरम्यान पोलिसांनी त्याच्या आर्थिक व्यवहारांची कसून चौकशी
केली. याच उद्देशाने पोलिसांचे एक पथक अहमदाबादलाही गेले होते. शॅगीची देशविदेशातील बँकांमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावे खाती असल्याचे तपासादरम्यान स्पष्ट झाले होते. काळा पैसा लपवण्यासाठी त्याने या बनावट कंपन्या स्थापन केल्या होत्या. ८ एप्रिल रोजी भारतात परतल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. परंतु, तत्पूर्वीच त्याने कोट्यवधी रुपयांची विल्हेवाट लावली होती. विदेशातील बँक खात्यांमध्ये
त्याने मोठी रक्कम वळती केल्याची माहिती पोलिसांना तपासादरम्यान मिळाली आहे.शॅगीचे आर्थिक हितसंबंध कुणाकुणाशी होते, त्यांच्याकडून या प्रकरणाची माहिती मिळते का, यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे.
कॉल सेंटर प्रकरणात आॅक्टोबर २०१६ मध्ये पोलिसांनी जगदीश कनानीला अटक केली होती. पोलीस कारवाईची कुणकुण लागल्याने त्याने आधीच संगणकांच्या हार्डडिस्कची विल्हेवाट लावून पुरावे नष्ट केले होते. कनानी हा देखील काळ्या धंद्यामध्ये मुख्य भूमिकेत होता, अशी माहिती शॅगीने पोलिसांना दिली आहे. त्यामुळे कनानीदेखील पुन्हा पोलिसांच्या रडारवर आला आहे. (प्रतिनिधी)