On the shadow hospital ventilator | छाया रुग्णालय व्हेंटिलेटरवर

छाया रुग्णालय व्हेंटिलेटरवर


लोकमत न्यूज नेटवर्क
अंबरनाथ : येथील छाया रुग्णालयात केवळ दोन डॉक्टर व जेमतेम सहा कर्मचारी उपलब्ध आहेत. त्यामुळे अपुरे मनुष्यबळ आणि साधनसामग्रीमुळे सेवा देताना कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
कोरोनाकाळात वैद्यकीय सेवेवर परिणाम होत असताना कोरोनाव्यतिरिक्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी मोजकीच रुग्णालये पुढे येत आहेत. त्यातच गोरगरीब नागरिकांसाठी छाया रुग्णालय हे आधार होते. मात्र, सध्या या रुग्णालयाची अवस्था बिकट झाली आहे. रुग्णालयात वैद्यकीय सेवकांचा अभाव असल्याने तेथे पूर्ण क्षमतेने काम करणे अवघड जात आहे.
सरकारी रुग्णालय असलेल्या छाया रुग्णालयात अधीक्षक डॉ. शशिकांत डोडे व डॉ. सचिन देशमुख हे दोनच डॉक्टर उपलब्ध आहेत. सरकारकडे सात वैद्यकीय अधिकाऱ्यांची वारंवार मागणी केल्यानंतर डॉ. सुनील घाटकर, डॉ. शुभांगी वडेकर, डॉ. सचिन देशमुख, डॉ. योगेश पाल, डॉ. विक्रांत गुजर या पाच जणांची नियुक्ती केली. मात्र, काही महिन्यांपूर्वी डॉ. वडेकर यांची कोविड रुग्णालय, अंबरनाथ, पाल यांची जिल्हा रुग्णालय ठाणे, विक्रांत गुजर यांची मुरबाड ग्रामीण रुग्णालय येथे बदली झाली. तर, डॉ. घाटकर हे आजारी असून ते उपचार घेत आहेत.

इमारत झाली धोकादायक; राज्य सरकारचे होतेय दुर्लक्ष
५० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले रुग्णालय गेल्या २८ वर्षांपासून व्हेंटिलेटरवर आहे. डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी यांची कमतरता, रुग्णालयातील संगणक बंद आहेत. शस्त्रक्रियागृह, शवविच्छेदनगृह, रुग्णवाहिका, जीर्ण झालेली धोकादायक इमारत अशा अनेक समस्यांकडे राज्य सरकार, अंबरनाथ नगरपालिका दुर्लक्ष करीत असल्याने सर्वसामान्य व गोरगरीब नागरिक आरोग्य सुविधांपासून वंचित आहे. अशा परिस्थितीत पुरुष, महिला, आयसोलेशन, प्रसूती, इम्युलायझेशन, ओपीडी, अपघात हे सर्व विभाग दोन डॉक्टर व सहा कर्मचारी यांना बघावे लागत आहे.

छाया रुग्णालयात पुरेसे डॉक्टर आहेत, मात्र कोविडमुळे काही डॉक्टरांची बदली करण्यात आली आहे. मात्र, बदलापूर येथून नुकतीच एका डॉक्टरची नियुक्ती छाया रुग्णालयात केली आहे. चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाºयांची नियुक्ती लवकरात लवकर केली जाईल.
- डॉ. कैलास पवार,
ठाणे जिल्हा आरोग्य संचालक

Web Title: On the shadow hospital ventilator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.