‘शबरी’ योजना रखडलेलीच
By Admin | Updated: April 25, 2017 00:04 IST2017-04-25T00:04:26+5:302017-04-25T00:04:26+5:30
शबरी घरकुल योजनेतील शहापूर येथील ३१५ पैकी १२१ घरांसाठी अनुदानाचा पहिला हप्ता देऊनही काम सुरू झाले नसल्याची

‘शबरी’ योजना रखडलेलीच
ठाणे : शबरी घरकुल योजनेतील शहापूर येथील ३१५ पैकी १२१ घरांसाठी अनुदानाचा पहिला हप्ता देऊनही काम सुरू झाले नसल्याची बाब ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी सोमवारी घेतलेल्या ठाणे जिल्हा परिषदेच्या कामांच्या आढावा बैठकीत समोर आली. त्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरताना दादाजी भुसे यांनी जिल्हा परिषदेच्या घरकुल योजनेच्या येत्या आठ दिवसांत स्वतंत्र बैठका घेऊन आढावा घेण्याचे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाला दिले.
शबरी घरकुल योजना, रमाई घरकुल योजना, राष्ट्रीय जीवनोन्नती अभियान, महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण), चौदाव्या वित्त आयोगानुसार प्राप्त निधी इत्यादी योजनांचा आढावा भुसे यांनी क्रमवार घेतला.
शबरी घरकुल योजनेतील शहापूर येथील ३१५ पैकी १२१ घरांसाठी अनुदानाचा पहिला हप्ता देऊनही काम सुरू झाले नसल्याची बाब यावेळी समोर आली. याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरताना त्यांनी प्रत्येकाला घर मिळावे, असे शासनाचे धोरण असताना मंजूर झालेल्या घरांचे काम सुरू होत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. ठाणे जिल्हा परिषदेच्या घरकुल योजनांचा येत्या आठ दिवसांत स्वतंत्र बैठक घेऊन आढावा घेण्याचे आदेश ग्रामविकास राज्यमंत्र्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला दिले.
जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा डिजिटल झाल्याबद्दल तसेच जलयुक्तमध्ये चांगले काम झाल्याबद्दल त्यांनी अभिनंदनही केले. जनसुविधा योजनांचा तालुकानिहाय आढावा घ्यावा, असेही त्यांनी सुचवले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी सादरीकरण केले.
राज्यमंत्र्यांनी चौदाव्या वित्त आयोगातील प्राप्त निधीचा विनियोग, आमचे गाव, आमचा विकास कार्यक्र म, पेसा ग्रामपंचायती, तीर्थक्षेत्र विकास, सर्वशिक्षा अभियान, अनुसूचित जाती व नवबौद्धांच्या वस्त्यांचा विकास, अपंग कल्याण योजना, महिला बालकल्याण योजना, राष्ट्रीय पेयजल योजना, जिल्हा परिषद सेसमधून केली जाणारी कामे, बांधकाम विभाग आदींचा विस्तृत आढावा घेतला.
खासदार कपिल पाटील, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीदेखील महत्त्वाच्या सूचना केल्या.
सांसद आदर्श ग्राम योजनेची प्रगती अधिक वेगाने व्हावी, असेही ते म्हणाले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी भीमनवार यांनी कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी मध्यम कुपोषित बालकांच्या घरी १५ दिवसांतून एकदा, तर तीव्र कुपोषित बालकांच्या घरी ८ दिवसांतून एकदा डॉक्टरांनी भेट देऊन तपासणी करावी, असे निर्देश दिल्याची माहिती दिली.
उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून प्रशस्तीपत्र मिळाल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनादेखील राज्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी गौरवण्यात आले. या बैठकीस पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार कपिल पाटील, डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार किसान कथोरे, सुभाष भोईर, पांडुरंग बरोरा, शांताराम मोरे, रूपेश म्हात्रे, सहमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र पाटील, प्रकल्प अधिकारी रघुनाथ बामणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील, प्रवीण भावसार, जिल्हा कृषी अधिकारी प्रफुल्ल बनसोडे, शिक्षणाधिकारी मीना यादव, समाजकल्याण अधिकारी पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)