ऑक्सिजन मास्कमुळे रुग्णाच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:42 IST2021-04-04T04:42:16+5:302021-04-04T04:42:16+5:30
अंबरनाथ : बदलापूरच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णाच्या चेहऱ्यावर लावण्यात आलेल्या मास्कमुळे त्याच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्याचे निदर्शनास आले आहे. ...

ऑक्सिजन मास्कमुळे रुग्णाच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा
अंबरनाथ : बदलापूरच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णाच्या चेहऱ्यावर लावण्यात आलेल्या मास्कमुळे त्याच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकाराबद्दल रुग्ण व त्याच्या नातलगांनी नाराजी व्यक्त केली आहे.
बदलापूर गावातील प्रदीप गंद्रे यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. गंद्रे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना १९ दिवस अतिदक्षता विभागात बायपॅप मशीन लावून ठेवण्यात आले होते. मात्र सतत १९ दिवस बायपॅप लावल्यामुळे गंद्रे यांच्या चेहऱ्यावर जखमा झाल्या. मास्क घट्ट असल्याने त्यांच्या नाकावर आणि कपाळावर जखमांचे काळे डाग पडले आहेत. रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे आणि एकच मास्क १९ दिवस लावल्यामुळेच आपला चेहरा विद्रुप झाल्याचा आरोप गंद्रे यांनी केला, तर गंद्रे यांची प्रकृती नाजूक असल्याने त्यांना १९ दिवस सतत मास्क लावणे गरजेचे होते. हा मास्क घट्ट लावणे गरजेचे असल्याने या जखमा होतात. मात्र आम्ही त्यावर उपाय म्हणून चेहऱ्यावर पट्ट्या लावतो, असे डॉ. मुकुंद राडे यांनी स्पष्ट केले.
---------------------------------------------
वाचली