कसाऱ्यात सात दिवसांचा जनता कर्फ्यू लागू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 00:41 IST2021-04-19T00:41:23+5:302021-04-19T00:41:28+5:30
अंमलबजावणीला सुरुवात : साखळी तोडण्यासाठी व्यापारी, नागरिकांचा प्रतिसाद

कसाऱ्यात सात दिवसांचा जनता कर्फ्यू लागू
लोकमत न्यूज नेटवर्क
कसारा : राज्य सरकारने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत आठवड्यातून दोन दिवस कडक लॉकडाऊन जाहीर केला होता. मात्र, दोन दिवसांच्या बंदमुळे कोविड रुग्णांची संख्या कमी होत नसल्याने कसारा ग्रामपंचायत, पोलीस, आरोग्य सेवा या स्थानिक प्रशासनाने कसारा व परिसरातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता कसाऱ्यात स्वयंस्फूर्तीने सात दिवस जनता कर्फ्यू जाहीर केला आहे.
रविवारपासून सुरू झालेल्या या कर्फ्यूला व्यापाऱ्यांसह ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला. रविवारी सकाळपासूनच कसारा बाजारपेठ परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला होता. अत्यावश्यक सेवेतील सर्वांनी बंदमध्ये सहभाग दाखवून प्रशासनास सहकार्य केले. बंद दरम्यान ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, शहापूर उपविभागीय पोलीस अधीक्षक नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी के. ए. नाईक, गणेश माळी यांनी चोख बंदोबस्त ठेवत रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली.
कसारा परिसरात अनेक कोरोना रुग्ण आहेत. काही रुग्ण बाजारपेठेत बिनधास्त फिरत आहेत. शिवाय रुग्ण वाढत आहेत. त्यासाठी विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई व्हावी तसेच कोरोना संक्रमणाची चेन तुटावी यासाठी सात दिवसांचे कडक लॉकडाऊन आम्ही जाहीर केले आहे.
- प्रियंका जाधव, सरपंच, मोखवणे
जनहितार्थ स्थानिक प्रशासनाने घेतलेला निर्णय कोरोनाची साखळी तोडू शकेल. या जनता कर्फ्यू दरम्यान जर कोणी विनाकारण फिरताना, विनामास्क फिरताना आढळल्यास, जमाव करून फिरत असल्यास अशा लोकांवर कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
- गणेश माळी,
सहायक पोलीस निरीक्षक, कसारा
स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने कोअर कमिटी तयार करून जनहितार्थ घेतलेला निर्णय योग्य आहे. या निर्णयामुळे आपल्या कार्यक्षेत्रातील कोविड रुग्ण साखळी तोडण्यास मदत होईल व प्रशासनास योग्य ते सहकार्य होईल.
- नीलिमा सूर्यवंशी, तहसीलदार