ज्येष्ठ नागरिक भवनाचा ताबा नाहीच
By Admin | Updated: January 24, 2017 05:43 IST2017-01-24T05:43:43+5:302017-01-24T05:43:43+5:30
मागील महापालिका निवडणुकीपूर्वी ठाणे महापालिकेने ‘ज्येष्ठ नागरिक भवन’ उभारण्याची घोषणा केली होती. मात्र, या भवनाचा ताबा

ज्येष्ठ नागरिक भवनाचा ताबा नाहीच
स्नेहा पावसकर / ठाणे
मागील महापालिका निवडणुकीपूर्वी ठाणे महापालिकेने ‘ज्येष्ठ नागरिक भवन’ उभारण्याची घोषणा केली होती. मात्र, या भवनाचा ताबा वारंवार पाठपुरावा करूनही ज्येष्ठ नागरिकांना दिला नाही. आता निवडणुका आल्यावर तरी या निर्णयाची अंमलबजावणी होणार किंवा कसे, असा सवाल ज्येष्ठ नागरिक करीत आहेत.
ठाण्यात ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने असून शहरात सुमारे २५ ज्येष्ठ नागरिक संघ आहेत. त्या सर्वांची मिळून ज्येष्ठ नागरिक संघ, मध्यवर्ती समिती कार्यरत आहे. या समितीच्या माध्यमातून शहरातील ज्येष्ठांसाठी विविध सोयीसुविधा राबवण्यात येतात.
ज्येष्ठांच्या सोयीसाठी आणि समितीच्या कामासाठी महापालिकेने मागील निवडणुकीपूर्वी गजानन चौक परिसरातील ‘वारकरी भवन’ इमारतीचा पहिला मजला ‘ज्येष्ठ नागरिक भवन’ला दिला. त्यावेळी आमदार एकनाथ शिंदे यांनीही एका बैठकीदरम्यान ज्येष्ठांकडून नाममात्र म्हणजे अगदी एक रुपया भाडे घेऊन भवनाची जागा द्यावी, असे सुचवले होते. मात्र, त्यानंतरही महापालिका प्रशासनाकडून आलेल्या पत्रात या जागेसाठी वर्षाला ७ लाख रुपये भाडे आकारले जाईल, असे सांगितले.
अनेक ज्येष्ठ नागरिक हे निवृत्त असतात. तसेच ही समिती ज्येष्ठांच्या सोयीसाठी कार्यरत असून तिला उत्पन्नाचे काही साधन नाही. त्यामुळे इतके मोठे शुल्क भरणे अशक्य असल्याने ते कमी करण्याची विनंती केली होती. अनेकदा पाठपुरावा करूनही त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नसून अद्यापही जागेचा ताबा मिळालेला नाही.
ज्येष्ठांच्या सुरक्षेसाठी पोलिसांबरोबरच समितीही वेगळा उपक्रम राबवण्याच्या विचारात आहे. तसेच ज्येष्ठांच्या विविध आजारांवर मात करण्यासाठी लागणारे साहित्य ठेवायलाही जागा नसल्याने त्यांना सुविधा देता येत नाही. त्यामुळे आमच्यासाठीच अलॉट केलेली भवनाची जागा देऊन आम्हाला आधार मिळावा, अशी अपेक्षा ज्येष्ठ नागरिक व्यक्त करत आहेत. आता यावर काय कार्यवाही होते ते पहायचे. (प्रतिनिधी)