सेनेला सत्तेचा लोभ!
By Admin | Updated: February 13, 2017 05:06 IST2017-02-13T05:06:09+5:302017-02-13T05:06:09+5:30
निवडणुकांच्या निमित्ताने भाजप-सेनेत रंगलेल्या संघर्षाचे विश्लेषण राज्यातील जनता करते आहे. दोन्ही पक्ष एकत्र सत्ता हाती ठेवतात

सेनेला सत्तेचा लोभ!
ठाणे : निवडणुकांच्या निमित्ताने भाजप-सेनेत रंगलेल्या संघर्षाचे विश्लेषण राज्यातील जनता करते आहे. दोन्ही पक्ष एकत्र सत्ता हाती ठेवतात आणि व्यासपीठावरून परस्परांची लक्तरे काढतात. मुख्यमंत्र्यांना खुर्चीची भीती आहे; तर शिवसेनेचा सत्तेचा लोभ सुटत नाही, असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी केला.
ठाण्यातील उमेदवारांच्या प्रचारासाठी कळवा-खारेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारसभेत त्यांनी भाजप-सेनेवर तोंडसुख घेतले. निवडणुकीनिमित्ताने मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचे खरे रूप महाराष्ट्रातील जनतेसमोर मांडल्याबद्दल पवार यांनी उपरोधिक भाषेत त्यांचे आभार मानले.
शिवसेनेवर गुन्हेगारीचे आरोप करणारे मुख्यमंत्री गृहखाते आपल्याकडेच आहे, हे विसरतात. गृहमंत्री या नात्याने या गुन्हेगारीचा बिमोड करण्याची जबाबदारी त्यांचीच आहे. मात्र खुर्चीची भीती असल्याने मुख्यमंत्री ते करणार नाहीत, असा आरोप पवार यांनी केला. भाजपच्या उमेदवारांना निवडून दिल्यास विकास करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देत आहेत. याचा अर्थ लोकांनी भाजपला मतदान न केल्यास मुख्यमंत्री विकास करणार नाहीत असा तर नाही ना, असा चिमटाही त्यांनी काढला.
आधी मालमत्ता कर वाढवायचा आणि मग मालमत्ता कर रद्द करण्याचे आश्वासन वचननाम्यातून देणाऱ्या शिवसेनेवर पवार यांनी दुटप्पीपणाचा आरोप केला. बलात्कार आणि खुनासारखे गंभीर आरोप असलेले गुन्हेगारी प्रवृत्तीचे उमेदवार ठाणेकरांवर लादणाऱ्या शिवसेनेचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे आहेत. या पक्षाच्या कारभारामुळे ठाण्यातील पाण्याचे नियोजन फसले आहे. एकेकाळी अभ्यासू लोकांनी नेतृत्व केलेल्या ठाणे महापालिकेची अवस्था शिवसेनेने बकाल केली. गेल्या २0 वर्षांमध्ये एकही मोठा प्रकल्प शिवसेना पूर्ण करू शकली नाही. त्यामुळे या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना खड्यासारखे बाजुला करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी पवार यांनी ठाणे महापालिकेची तुलना नवी मुंबईशी केली. नवी मुंबई महापालिकेने तेथील रहिवाशांवर कोणतीही करवाढ लादली नाही. नवी मुंबई महापालिकेच्या शहर बससेवेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना ७५ टक्के प्रवास सवलत दिली जाते. ठाणे महापालिका मात्र जुनी असूनही केवळ ५0 टक्केच सवलत देते. ठाणे महापालिकेने लोकांवर अलिकडेच करवाढ लादली. आता निवडणुकीत लोकांसमोर जायला तोंड नसल्याने शिवसेनेने मालमत्ता कर रद्द करण्याचे आश्वासन वचननाम्याच्या माध्यमातून दिले असल्याचा आरोप पवार यांनी केला. मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचा समाचारही पवार यांनी यावेळी घेतला. नोटाबंदीने असंख्य सामान्यांचे संसार उद््ध्वस्त केले. मालेगाव, भिवंडीतील हजारो कामगार घरी बसल्याचा आरोप त्यांनी केला.
सभेच्या सुरूवातीला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना संबोधताना पक्षाच्या विकासकामांचा आढावा घेतला. कळवा परिसरातील अनेक महत्वपूर्ण प्रकल्प केवळ राष्ट्रवादी काँग्रेसमुळे मार्गी लागले असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाचे नेते गणेश नाईक यांचेही यावेळी समयोचित भाषण झाले. व्यासपीठावर ज्येष्ठ नेते वसंत डावखरे, आमदार निरंजन डावखरे, शहर अध्यक्ष आनंद परांजपे, माजी खासदार संजीव नाईक, मनोहर साळवी यांच्यासह इतर नेते आणि महापालिका निवडणुकीतील पक्षाचे उमेदवार उपस्थित होते. (प्रतिनिधी)