‘कॉल सेंटर’ सिनेमावर शिक्कामोर्तब
By Admin | Updated: March 23, 2017 01:29 IST2017-03-23T01:29:06+5:302017-03-23T01:29:06+5:30
कॉल सेंटर घोटाळ्यावरील चित्रपटाची पटकथा तयार करण्यासाठी, त्याची साग्रसंगीत माहिती घेण्यासाठी टॉलिवूडमधील प्रसिद्ध

‘कॉल सेंटर’ सिनेमावर शिक्कामोर्तब
ठाणे : कॉल सेंटर घोटाळ्यावरील चित्रपटाची पटकथा तयार करण्यासाठी, त्याची साग्रसंगीत माहिती घेण्यासाठी टॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शकांच्या माध्यमातून ख्रिस नामक व्यक्तीसह अन्य दोघांनी बुधवारी पुन्हा ठाणे शहर पोलिसांची भेट घेतली. तब्बल तीन तासांहून अधिक काळ चाललेल्या या चर्चेत प्रामुख्याने शॅगी उर्फ सागर ठक्कर याच्या राहणीमानापासून त्याच्याबाबत वेगवेगळ््या माहितीवर त्यांनी भर दिला. मीरा रोड येथील ज्या इमारतीत कॉल सेंटर घोटाळ्याला सुरुवात झाली, ते कॉल सेंटरही ही मंडळी आवर्जून पाहणार आहेत.
कॉल सेंटर घोटाळ्यावर चित्रपट येणार हे यामुळे स्पष्ट झाले आहे. टॉलीवूडमधील दिग्दर्शकांनी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि गुन्हे शाखेचे उपायुक्त पराग मणेरे यांची भेटीनंतर ठाणे गुन्हे शाखेच्या कार्यालयात वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांची भेट घेत, चित्रपटासाठी लागणाऱ्या इतर तपशीलावर चर्चा केली. तपासातील बारकावे जाणून घेतले. कॉल सेंटर घोटाळ्याची सुरुवात कुठून कशी झाली. त्यात तरूण कोणकोणत्या प्रकारे ओढले गेले, याची माहिती पोलिसांना कशी मिळाली, पोलिसांनी कसा तपास करीत पर्दाफाश केला, शॅगी आणि त्याचा गुरु जगदीश कनानी यांची माहिती, शॅगीला हिरो करून त्यांचे राहणे, कॉल सेंटरची त्याची कल्पना प्रत्यक्षात आणणेत्याला मोठे रुप देणे, अमेरिकन नागरिकांचा डाटा गोळा करणे अशा मुद्दयांवरही चर्चा झाली.
हा गुन्हा उघडकीस आणण्यात मदत करणाऱ्या काही खास मंडळींची ठाणे पोलिसांनी टॉलीवूडमधून आलेल्या त्या मंडळींशी गाठ घालून दिली. त्यांच्यात काही तास चर्चा झाली. त्यातही शॅगी हाच केंद्रबिंदू होता. त्यांच्याकडूनही या मंडळींनी शॅगी आणि कॉल सेंटरच्या छोट्या-छोट्या गोष्टींविषयी माहिती जाणून घेतली. (प्रतिनिधी)