दुसऱ्या फेरीतही मोर्चे, आंदोलने
By Admin | Updated: April 1, 2017 05:52 IST2017-04-01T05:52:14+5:302017-04-01T05:52:14+5:30
आरटीई प्रवेशप्रक्रियेची दुसरी फेरी सोमवारपासून सुरू झाली असून ती पहिल्या फेरीपेक्षा अधिक गोंधळाची ठरते आहे.

दुसऱ्या फेरीतही मोर्चे, आंदोलने
ठाणे : आरटीई प्रवेशप्रक्रियेची दुसरी फेरी सोमवारपासून सुरू झाली असून ती पहिल्या फेरीपेक्षा अधिक गोंधळाची ठरते आहे. सुरुवातीला एसएमएस न आल्याने आणि नंतर शाळांकडून प्रवेशासाठीचा आडमुठेपणा, शैक्षणिक शुल्काची मागणी यामुळे पालक हवालदिल झाले आहेत. पहिल्या फेरीतील मोर्चे, आंदोलनांनंतर तरी शाळांमध्ये प्रवेश घेणे सुकर होईल, अशी अपेक्षा बाळगलेले पालक दुसऱ्या फेरीतही मोर्चे, आंदोलनांचाच आधार घेण्याच्या विचारात आहेत.
समान शिक्षण हक्कासाठी आरटीई प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तिची दुसरी फेरी सोमवारपासून सुरू झाली असून ८ एप्रिल शेवटचा दिवस आहे. मात्र, दुसऱ्या फेरीच्या पहिल्याच दिवशी यादीत नाव येऊनही एसएमएस न आल्याने पालकांमध्ये गोंधळ उडाला. त्यानंतरही काही शाळांनी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याबाबत आडमुठेपणा घेत त्याची अनेक कारणे दिली. प्रवेश देणाऱ्या शाळा शैक्षणिक साहित्यासाठी पालकांकडूनच शुल्क मागत आहेत. काही शाळा आम्ही पुस्तके मोफत देऊ, मात्र गणवेशासाठी तरी पैसे द्यावेच लागतील, असे सांगत आहेत. त्यामुळे पालक हतबल झाले आहेत.
पहिल्या फेरीत अशाच विविध प्रश्नांसाठी पालकांनी डेमोक्रेटिक युथ फेडरेशन आॅफ इंडिया संघटनेच्या माध्यमातून आंदोलने केली होती. परंतु, दुसऱ्या फेरीतही तोच किंबहुना त्यापेक्षा गोंधळ वाढला आहे, असे मत पालक व्यक्त करीत आहेत. दुसऱ्या फेरीतही हे गोंधळ असेच सुरू राहिले, तर पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा पालक आणि संघटनेने दिला आहे. (प्रतिनिधी)
डेमोक्रेटिक युथ फेडरेशन आॅफ इंडिया, अर्थात संघटनेच्या माध्यमातून आंदोलने केल्यावर काही शाळा प्रशासन माघार घेऊन सकारात्मक प्रक्रिया करतात. मात्र, एकट्याने या प्रश्नांना सामोरे जाणाऱ्या पालकांना शाळा अरेरावी करतात. त्यामुळे अधिकाधिक पालकांनी तरी आम्हाला संपर्क करावा.
-अॅड. नितीन धुळे, डेमोक्रेटिक युथ फेडरेशन आॅफ इंडिया, ठाणे जिल्हाध्यक्ष
पहिल्या फेरीत जिल्ह्यातील काही शाळांनी पालकांना फेऱ्या घालायला लावल्या होत्या. अशा ६-७ शाळा होत्या. त्यांना समज दिल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना प्रवेश दिले आहेत. दुसरी फेरी ८ तारखेपर्यंत असून या फेरीतही पहिल्या फेरीप्रमाणे पालकांच्या काही तक्रारी आल्या, तर तालुका आणि मनपानिहाय ११ समित्या पुन्हा चौकशी करतील.
-मीना यादव, जिल्हा शिक्षणाधिकारी,
प्राथमिक विभाग, ठाणे