आॅनलाइन माहितीसाठी शाळांना वाढीव तीन दिवस मिळणार
By Admin | Updated: September 29, 2015 01:08 IST2015-09-29T01:08:32+5:302015-09-29T01:08:32+5:30
‘सरल’ प्रणालीच्या वेबसाइटवरील ताण कमी करण्यासाठी जिल्ह्यातील शाळा, शैक्षणिक संस्थांना त्यांच्या शिक्षकांसह विद्यार्थ्यांची माहिती आॅनलाइन लोड करण्यासाठी ठरावीक मुदत दिली होती

आॅनलाइन माहितीसाठी शाळांना वाढीव तीन दिवस मिळणार
ठाणे : ‘सरल’ प्रणालीच्या वेबसाइटवरील ताण कमी करण्यासाठी जिल्ह्यातील शाळा, शैक्षणिक संस्थांना त्यांच्या शिक्षकांसह विद्यार्थ्यांची माहिती आॅनलाइन लोड करण्यासाठी ठरावीक मुदत दिली होती. परंतु, त्यातील तीन दिवसांचा कालावधी सुटीत गेल्यामुळे राहिलेल्या एका दिवसाच्या कार्यालयीन वेळेत १५ लाख विद्यार्थ्यांची माहिती लोड करणे शक्य नाही. त्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतची वाढीव तीन दिवसांच्या मुदतीसाठी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षण उपसंचालकांकडे मागणी केली आहे.
कोकणातील शाळांची माहिती आॅनलाइन भरण्यासाठी २५ ते २८ सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती. या कालावधीत रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांपेक्षा ठाणे जिल्ह्यात १५ लाख विद्यार्थ्यांची माहिती एका दिवसात लोड करणे शक्य नाही. यामुळे ३० सप्टेंबरपर्यंत वाढीव मुदतीची मागणी उपसंचालकांकडे केली असल्याचे जिल्हा शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी सांगितले.
जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमधील १५ लाख १६ हजार २९५ विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती आॅनलाइन संकलित केली जाणार आहे. सर्व शैक्षणिक संस्था,शाळा, शिक्षक आणि विद्यार्थी आदींची वैयक्तिक माहिती राज्य शासनाच्या शालेय विभागाव्दारे आॅनलाइन संकलित केली जात आहे. यासाठी सरल प्रणाली सुरू केली आहे. त्याव्दारे जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्राची इत्थंभूत माहिती आॅनलाइन लोड केली जाणार आहे. त्यासाठी वाढीव मुदतीची मागणी केली असून ती जवळजवळ मान्य झाल्याचे सूतोवाच शेंडकर यांनी केले.