सिग्नलवरील मुलांसाठी स्कूल बस देणार
By Admin | Updated: March 31, 2017 05:57 IST2017-03-31T05:57:57+5:302017-03-31T05:57:57+5:30
ठाण्यातील इतर सिग्नलवरील मुलांना सिग्नल शाळेत शिकण्यासाठी आणण्यास स्कूल बसची सुविधा महापालिका उपलब्ध

सिग्नलवरील मुलांसाठी स्कूल बस देणार
ठाणे : ठाण्यातील इतर सिग्नलवरील मुलांना सिग्नल शाळेत शिकण्यासाठी आणण्यास स्कूल बसची सुविधा महापालिका उपलब्ध करून देणार असून शिक्षकांचे मानधनदेखील महापालिकेच्या वतीने देण्यात येईल, अशी घोषणा महापौर मीनाक्षी शिंदे व पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मंगळवारी केली. तसेच, या मुलांच्या पालकांच्या निवाऱ्यासाठी महापालिका प्रयत्न करणार असल्याचेही या वेळी आयुक्तांनी सांगितले.
समर्थ भारत व्यासपीठ आणि ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या सिग्नल शाळेतील विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे पूर्व प्राथमिक वर्गासाठीचे बालमंदिर मंगळवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरू करण्यात आले. एका छोट्या कंटेनरमध्ये शिकत असलेल्या या मुलांना आता बालमंदिरच्या माध्यमातून नवीन वर्ग मिळाल्याने शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यास अधिक मदत होणार आहे. गेल्या शैक्षणिक वर्षापासून ठाणे येथील तीनहातनाका सिग्नलवरील जवळपास ३० मुलांसाठी ही शाळा सुरू केली आहे.
छोट्या कंटेनरमध्ये पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिकमधील मुले शिकत होती. पूर्व प्राथमिक वर्गातील मुलांना शिकवण्याच्या पद्धतीत गाणी, गोष्टी, गप्पा अशा शिक्षणपद्धतीचा समावेश असल्याने शाळेतील इतर विद्यार्थ्यांच्या शिक्षणात व्यत्यय येत असल्याची अडचण लक्षात घेऊन एका कंपनीने सिग्नल शाळेत बालमंदिरची उभारणी करून दिली आहे. महापौर मीनाक्षी शिंदे, आयुक्त संजीव जयस्वाल, सभागृह नेते नरेश म्हस्के, भाजपा गटनेते मिलिंद पाटणकर, स्थानिक नगरसेवक विकास रेपाळे, उपायुक्त मनीष जोशी, शिक्षणाधिकारी ऊर्मिला पारधे, जोकर गमचे संचालक प्रदीप ठक्कर, समर्थ भारत व्यासपीठाचे कार्याध्यक्ष मंगेश वाळंज, उपाध्यक्ष उल्हास कार्ले, ज्येष्ठ पत्रकार किरण शेलार, नगरसेवक सुनेश जोशी, प्रा. बाळासाहेब खोल्लम, सेंट्रल बँक आॅफ इंडियाचे सतीशकुमार मुकटे यांच्या उपस्थितीत या बालमंदिरचे उद्घाटन पार पडले. (प्रतिनिधी)