टंचाईग्रस्त भागाला पाणी मिळाले पण रसायनयुक्त
By Admin | Updated: May 5, 2017 05:45 IST2017-05-05T05:45:47+5:302017-05-05T05:45:47+5:30
येथील पाणीटंचाईबाबत ‘प्रशासनाने केले एप्रिल फूल’ या मथळ्याखाली लोकमतने प्रकाशित केलेल्या वृत्तामुळे तालुक्यासह जिल्हा

टंचाईग्रस्त भागाला पाणी मिळाले पण रसायनयुक्त
मुरबाड : येथील पाणीटंचाईबाबत ‘प्रशासनाने केले एप्रिल फूल’ या मथळ्याखाली लोकमतने प्रकाशित केलेल्या वृत्तामुळे तालुक्यासह जिल्हा प्रशासन हादरले असून त्यांनी तत्काळ मुरबाड तालुक्यातील टंचाईग्रस्त भागांत पाणीपुरवठा करण्यासाठी दोन टँकर तैनात केले.
मात्र, ते टँकर रसायनयुक्त असून भंगारातीलच वाटत असल्याने या भंंगार आणि रसायनयुक्त टँकरच्या दूषित पाण्याने गावात किंवा परिसरात दुर्घटना होण्याचा धोका आहे. त्यामुळे तातडीने कार्यवाही होऊन पाणी मिळाले म्हणून आनंद मानावा की, रसायनयुक्त पाणी मिळाल्याचे दु:ख करावे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. तालुक्यातील म्हाडस, बांधिवली, पाटगाव, गेटाचीवाडी, तागवाडी, मोहघर, तुळयी, साकुर्ली, वाल्हिवरे, झाडघर, न्याहाडी, किसळ, तोंडळी, सासणे या गावांसह ५१ गावांमध्ये डिसेंबरपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. यावर उपाय म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाने १ एप्रिलपासून टँकर पुरवण्याचे आदेश दिले. मात्र, जवळपास महिनाभर यावर काहीच कार्यवाही झाली नाही. याबाबत, वृत्त प्रकाशित होताच प्रशासनाने पाण्याची सोय तर केली, पण ते देखील रसायनयुक्त. या टँकरने आलेले पाणी प्रथम अधिकारीवर्गाने प्यावे. या पाण्यावर तहान भागवण्यापेक्षा आम्हाला डबक्यातील पाणीच बरे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
नागरिकांची तहान भागवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने नोटीस काढून नोंदणीकृत पात्र ठेकेदारांकडून निविदा मागवून मगच या ठेकेदाराची निवड केलेली आहे. तरीही, जर असे रसायनयुक्त टँकरने पाणी मिळत असेल, तर हे पाणी शुद्ध की दूषित, याची खात्री कोण करणार, असा प्रश्न नागरिकांना सतावत आहे. (वार्ताहर)
या पाणीपुरवठ्यासंदर्भात आमच्याकडून कोणतीही कार्यवाही होत नाही. ठेकेदाराची निवड जिल्हाधिकारी कार्यालयाने केली आहे. शिवाय, प्रत्येक टँकरमध्ये जीपीएस युनिट बसवले आसल्याने त्या टँकरची स्थिती पाहावयास मिळते.
- नारायण राऊत, जि.प. पाणीपुरवठा विभाग, कार्यकारी अभियंता
आमचे टँकर हे जरी रसायनयुक्त असले तरी ते सफाई करून आणलेले आहेत. त्यामुळे या टँकरने दूषित पाणीपुरवठा होण्याचा प्रश्न उद्भवत नाही. तसेच ही वाहने जरी जुनी असली तरी आरटीओच्या नियमांचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन होत नाही. तसा जिल्हाधिकारी कार्यालयाशी करारनामा केलेला आहे. - जगधने, पाणीपुरवठा ठेकेदार