कल्याण आरटीओकडे सव्वाकोटी जमा
By Admin | Updated: November 16, 2016 04:27 IST2016-11-16T04:27:01+5:302016-11-16T04:27:01+5:30
राज्य सरकारने ५०० आणि एक हजारांच्या नोटा रद्द केल्यानंतर कल्याणच्या आरटीओ कार्यालयात कर थकबाकीदार वाहनचालकांनी

कल्याण आरटीओकडे सव्वाकोटी जमा
डोंबिवली : राज्य सरकारने ५०० आणि एक हजारांच्या नोटा रद्द केल्यानंतर कल्याणच्या आरटीओ कार्यालयात कर थकबाकीदार वाहनचालकांनी आठवडाभरात एक कोटी २० लाखांचा भरणा केला आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर नाईक यांनी दिली.
नरेंद्र मोदी यांनी चलनातून ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, त्यानंतर उडालेल्या गोंधळामुळे राज्य सरकारने या नोटा महापालिकांसह सर्व सरकारी कार्यालयांत स्वीकारल्या जातील, असे जाहीर केले होते. त्या पार्श्वभूमीवर कल्याण आरटीओमध्ये कर वसुलीसाठी जुन्या नोटा स्वीकारल्या जात आहेत.
कर थकवणाऱ्यांमध्ये ट्रक, टम्पो, स्कूल बसचालकांचा समावेश आहे. गुरू नानक जयंतीनिमित्त सोमवारी सरकारी कार्यालयांना सुटी असतानाही कल्याण आरटीओ कार्यालयात करवसुली सुरू होती. दिवसभरात १९ लाख ४५ हजारांची वसुली झाल्याचे नाईक यांनी सांगितले. या निमित्ताने अनेक वर्षांपासूनची थकबाकी वसूल होत असल्याचे समाधान आहे. नागरिकांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. सरकारचा कर थकवता कामा नये, तो कधीना कधी भरावाच लागतो हे नागरिकांनी समजून घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. (प्रतिनिधी)