सावरकरांची नाटके म्हणजे शक्तिपीठे
By Admin | Updated: April 23, 2017 04:07 IST2017-04-23T04:07:28+5:302017-04-23T04:07:28+5:30
सावरकरांनी साहित्याच्या सर्व प्रकारांत लेखन केले असले, तरी नाटके खूपच कमी लिहिली. उ:शाप, संन्यस्त खड्ग, उत्तरक्रिया ही तीन आणि बोधिवृक्ष हे नाटक

सावरकरांची नाटके म्हणजे शक्तिपीठे
ठाणे : सावरकरांनी साहित्याच्या सर्व प्रकारांत लेखन केले असले, तरी नाटके खूपच कमी लिहिली. उ:शाप, संन्यस्त खड्ग, उत्तरक्रिया ही तीन आणि बोधिवृक्ष हे नाटक मात्र त्यांनी अर्धवट लिहिले. अर्थात, साडेतीन नाटके त्यांनी लिहिली. मात्र, ज्याप्रमाणे धार्मिक क्षेत्रात साडेतीन शक्तिपीठे आहेत, त्याचप्रमाणे सावरकरांनी लिहिलेली ही नाटके म्हणजे नाट्यसृष्टीतील साडेतीन शक्तिपीठे आहेत, असे मत रंगकर्मी, लेखक प्रमोद पवार यांनी व्यक्त केले.
गडकरी रंगायतन येथे सुरू असलेल्या एकोणतिसाव्या अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलनात ‘सावरकरांचे साहित्य विश्व’ या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. त्या वेळी पवार बोलत होते. सावरकरांची नाटके मनोरंजनापलीकडची आहेत. आज रंगभूमीवर अनेक नाटके येतात. मात्र, त्यातील किती नाटके वैचारिक आहेत, समाजाला उपदेश देणारे किती लेखक आहेत, याचा विचार करण्याची गरज आहे. हे संमेलन म्हणजे सावरकरांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न असून त्याला आपण सगळ्यांनी हातभार लावला पाहिजे, असे ते म्हणाले.
सावरकरांची नाटके नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असून ती रंगमंचावर कमीतकमी खर्चात पुनरुज्जीवित करण्याची इच्छा व्यक्त करत आयोजकांनी यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही पवार यांनी केले.
भारतकुमार राऊत या परिसंवादाचे अध्यक्ष होते. ते म्हणाले की, सावरकरांच्या मनात धगधगते विचार, स्वातंत्र्याची ऊर्मी होती. त्याच्यासाठी त्यागाची तयारी होती आणि हे शब्दबद्ध करण्यासाठी त्यांनी साहित्यनिर्मिती केली. त्यांचे साहित्यविश्व पाहिले, तर प्रतिभेची भरारी लक्षात येते. शब्द त्यांच्या प्रतिभेचे दूत होते.
मात्र, ते प्रतिभेचे कधीच गुलाम झाले नाहीत, असेही राऊत या वेळी म्हणाले. सावरकरांचे साहित्य विश्व खूप मोठे आहे. त्यांच्यावर तत्कालीन आणि त्यांच्या मरणानंतर आलेल्या सरकारनेही अन्याय केला. डॉ. शरद हेबाळकर यांनीही आपले विचार व्यक्त केले.
संमेलनाच्या सायंकाळच्या सत्रात वसंत आजगावकर, डॉ. सच्चिदानंद शेवडे, नागेश कांबळे, शैलेंद्र गौड, चंद्रकला कदम, दामोदर नेने, मधुकर ताम्हाणे, शंकर गोखले यांचा सावरकरव्रती पुरस्काराने सन्मान करण्यात आला. (प्रतिनिधी)
सदानंद मोरे अनुपस्थित
या परिसंवादाचे अध्यक्षस्थान प्रा. सदानंद मोरे भूषवणार होते. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते अनुपस्थित होते.