पदाधिकाऱ्यांच्या दालनांवर सव्वादोन कोटींची उधळपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 12:53 AM2019-11-15T00:53:55+5:302019-11-15T00:57:50+5:30

सभापतींच्या दालनांचे विस्तारीकरण आणि नूतनीकरण करण्यासाठी तब्बल सव्वादोन कोटी रुपयांची उधळपट्टी चालवल्याने संताप व्यक्त होत आहे.

Savadone crooks ravaged on office bearers | पदाधिकाऱ्यांच्या दालनांवर सव्वादोन कोटींची उधळपट्टी

पदाधिकाऱ्यांच्या दालनांवर सव्वादोन कोटींची उधळपट्टी

Next

मीरा रोड : कर्जाच्या बोजाखाली दबलेल्या मीरा-भाईंदर महानगरपालिकेकडून एकीकडे नागरिकांवर करवाढ लादली जात असताना, दुसरीकडे मुख्यालयातील सुस्थितीत असलेल्या महापौर, उपमहापौर व स्थायी समिती सभापतींच्या दालनांचे विस्तारीकरण आणि नूतनीकरण करण्यासाठी तब्बल सव्वादोन कोटी रुपयांची उधळपट्टी चालवल्याने संताप व्यक्त होत आहे.
मीरा-भार्इंदर महापालिकेने पाणीपट्टी आदी करांमध्ये वाढ करतानाच नव्याने घनकचरा शुल्कही लावले आहे. त्यातच महापालिकेच्या विविध कामांसाठी म्हणून थोडेथोडके नव्हे तर तब्बल ४८१ कोटींच्या कर्जाचा बोजा आहे. नागरिकांवर लादलेली करवाढ आणि कर्जाच्या बोजाच्या तुलनेत आजही शहरातील नागरिकांना मूलभूत समस्यांनी ग्रासलेले आहे.
महापालिका मुख्यालयात नागरिकांची किती कामे होतात आणि किती समस्या सुटतात, हा वेगळा चर्चेचा विषय आहे. नागरिकांवर करवाढ आणि कर्जाचे ओझे असताना सत्ताधारी भाजपला मात्र महापालिकेतील आपली दालने आलिशान, चकचकीत आणि प्रशस्त हवी आहेत. आधीच भाजपने शिवसेनेच्या विरोधी पक्षनेत्याचे दुसºया मजल्यावरील दालन बहुमताच्या बळावर पहिल्या मजल्यावर हुसकावून लावले आहे.
महापौर डिम्पल मेहता यांनी आयुक्तांना पत्र देऊन महापौर दालनाची जागा अपुरी पडत असल्याने कामात अडथळा होतो, असे म्हटले होते. महापौरांकडे नगरसेवक, अधिकारी, संस्था आदींच्या बैठका होत असल्याने स्थायी समिती सभागृह महापौर दालनाशी जोडून त्याचे विस्तारीकरण करण्याची मागणी होती. त्याअनुषंगाने महापौर दालनाचा विस्तार व नूतनीकरण करण्यास त्यांनी सांगितले होते.
महापौरांच्या मागणीनंतर प्रशासनानेही महापौर दालनासह उपमहापौर आणि स्थायी समिती सभापती दालनांच्या नूतनीकरणाचे काम अत्यावश्यक असल्याचे सांगत त्याच्या निविदा मागवल्या. यासाठी स्पार्क सिव्हील इन्फ्राप्रोजेक्ट्स या ठेकेदारास २६ जुलै रोजी कार्यादेश देण्यात आले. पालिकेच्या निविदेनुसार अंदाजे दोन कोटी सात लाख ९१ हजारांचा खर्च असताना ठेकेदाराने तब्बल साडेचौदा टक्के जास्त दराची निविदा भरली. वाटाघाटीनंतर ती ८.९० टक्के जास्त दराने देण्यात आली.
ठेकेदाराने महापौर दालनाचे काम सुरू केले असून सध्या महापौर या उपमहापौर दालनात, तर उपमहापौर हे स्थायी समिती सभापती दालनात बसत आहेत. महापौर दालनाची पूर्णपणे तोडफोड करून ते आलिशान आणि प्रशस्त केले जाणार आहे. महापौर दालनात एक अ‍ॅण्टीचेम्बर असताना आणखी एक अ‍ॅण्टीचेम्बर वाढवले जाणार आहे. स्थायी समितीचे लालबहादूर शास्त्री सभागृह व चेम्बर हे महापौर दालनाला जोडले जाणार आहे. बाहेरचा मोकळा असलेला पॅसेजदेखील महापौर दालनात घेतला जाणार आहे. उपमहापौर दालन व स्थायी समिती सभापती दालन नंतर सुशोभित केले जाणार असून, सभापती दालनालगतच स्थायीच्या बैठकीसाठी दालन केले जाणार आहे.
महापौरांच्या दालनासाठी पालिका इमारतीच्या उत्तर दिशेला असलेल्या जिन्याचा मार्गदेखील बंद केला गेला आहे. सुरक्षितता आणि नियमांचा विचार करता जिन्याचा मार्ग बंद करता येत नाही. तरीदेखील प्रशासनाने दुसºया मजल्यावरील सदर जिन्याचा मार्गच दालनांसाठी बंद करून टाकला आहे. याप्रकरणी महापौर डिम्पल मेहतांशी प्रतिक्रियेसाठी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही. सभागृह नेते रोहिदास पाटील यांनी मात्र पदाधिकाऱ्यांच्या दालनांचे नूतनीकरण करण्याच्या कामात मला तरी काही वावगे वाटत नसल्याचे सांगितले.
।जनतेच्या पैशांवर मौजमजा करायला यांना लाज कशी वाटत नाही. नागरिकांवर भरमसाट कर लादले, कर्जाचा डोंगर उभा केला, सामान्य कामगारांचे हक्काचे पैसे देण्याची यांची दानत नाही; पण नागरिकांच्या पैशांवर पालिकेतील दालने मात्र आलिशान करतात. याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे.
- सुलतान पटेल (कार्याध्यक्ष, श्रमजीवी कामगार संघटना)

Web Title: Savadone crooks ravaged on office bearers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.