सरपंचाने मागितले होते एनओसीसाठी ५ लाख
By Admin | Updated: August 31, 2016 02:55 IST2016-08-31T02:55:19+5:302016-08-31T02:55:19+5:30
शेलावली-अंबाडी ग्रामपंचायतीचे सोमवारी अटक करण्यात आलेले नवनिर्वाचित सरपंच शांताराम चिमा सिताड यांनी एनओसी देण्यासाठी ५ लाखांची लाच मागितल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

सरपंचाने मागितले होते एनओसीसाठी ५ लाख
पालघर / नंडोरे : शेलावली-अंबाडी ग्रामपंचायतीचे सोमवारी अटक करण्यात आलेले नवनिर्वाचित सरपंच शांताराम चिमा सिताड यांनी एनओसी देण्यासाठी ५ लाखांची लाच मागितल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
याबाबतचे वृत्त असे की, पालघरमधील रहिवासी नितांत जगन्नाथ चव्हाण यांच्या पत्नीच्या नावाने शेलावली-अंबाडी ग्रामपंचायत हद्दीत सुमारे साडेतीन एकर जागा असून ती त्यांनी व्यापारी उद्देशासाठी वापरली होती. ग्रामपंचायती कडून तसा रितसर ना हरकत दाखला ही त्यांनी त्यावेळी घेतला होता. चव्हाण यांना ही जमीन आता रहिवासी कारणासाठी वापरायची होती. यासाठी त्यांनी ग्रामपंचायतीकडे रहिवासी ना हरकत दाखला मिळविण्यासाठी १२ आॅगस्ट रोजी अर्जही केला होता. २४ आॅगस्ट रोजी चव्हाण हे त्याबाबत चौकशीसाठी ग्रामपंचायतीत गेले असता सरपंच शांताराम सिताड याने व्यापारी वापराच्या दाखल्याचे रुपांतर रहिवासी दाखल्यात करून देण्यासाठी चव्हाण यांचेकडे ५ लाखांच्या लाचेची मागणी केली व त्यानुसार चार रस्ता, फाउंटन हॉटेल येथे हे पैसे घेऊन २९ आॅगस्ट रोजी बोलावले होते. चव्हाण यांनी या संबंधीची तक्रार पालघर लांचलुचपत प्रतिबंध विभागाकडे केली. त्यात तथ्य आढळून येताच लांचलुचपत विभागाने सापळा लावला व सरपंचाला ५ लाखांपैकी २ लाखांची लाचेची रोकड स्वीकारताना अटक केली. आरोपी सरपंचाने पैसे घेऊन बोलावलेल्या संबंधीत ठिकाणी परिस्थितीचा आढावा घेत सापळा रचून सरपंच शांताराम सिताड यांना अटक केली.
(वार्ताहर)