सरस्वती सेकंडरी व्हाया सिग्नल शाळा, आशेचा ‘किरण’ दहावीत ६० टक्यांनी उत्तीर्ण
By प्रज्ञा म्हात्रे | Updated: June 2, 2023 16:02 IST2023-06-02T16:02:21+5:302023-06-02T16:02:32+5:30
किरणची आई मीना काळे ही निरक्षर असुन गोखले रोडवर गजरे विकण्याचा व्यवसाय करते.

सरस्वती सेकंडरी व्हाया सिग्नल शाळा, आशेचा ‘किरण’ दहावीत ६० टक्यांनी उत्तीर्ण
ठाणे – ठाणे शहरातील विविध सिग्नलवर असलेल्या पुर्वाश्रमीच्या भीक्षेकरी मुलांना शिक्षणाच्या मुळ प्रवाहात आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या सिग्नल शाळेचा विदयार्थी किरण काळे दहावीची परिक्षा ६० टक्यांनी उत्तीर्ण झाला. वडील नसलेला किरण काळे आठ वर्षांचा असतांना सिग्नल शाळेत दाखल होता.
ठाणे महानगरपालिका आणि समर्थ भारत व्यासपीठ संस्थेच्या माध्यमातुन चालवल्या जात असलेल्या सिग्नल शाळेतील किरण काळे हा विदयार्थी ६० टक्के गुण मिळवत दहावी उत्तीर्ण झाला. तीन हात नाक्याखाली वडील नसलेला किरण आपल्या आई सोबत निर्वासित आयुष्य जगत होता. सिग्नल शाळेमुळे वयाच्या आठव्यावर्षी त्याला शाळेचे विश्व गवसले. सिग्नल शाळेत थेट तिसरीत दाखल झालेल्या किरणने आपल्यातील शैक्षणिक अनुशेष भरून काढत अभ्यासात चांगली प्रगती केली. त्याची ही प्रगती पाहुन संस्थेने त्याला सरस्वती सेकंडरी शाळेत प्रवेश दिला. तेथे देखील त्याने चांगले यश संपादन केली व आज दहावीच्या निकालात ६० टक्यांनी उत्तीर्ण होत तो रस्त्यावरील मुलांसाठी आशेचा किरण ठरला.
किरणची आई मीना काळे ही निरक्षर असुन गोखले रोडवर गजरे विकण्याचा व्यवसाय करते. किरण पुढील शिक्षण घेऊन आईसाठी एक घर घ्यायचे आहे. सिग्नल शाळेच्या प्रकल्प प्रमुख आरती परब व शिक्षिका शैला देसले, सरला पाटोळे, पोर्णिमा करंदीकर, समिधा इनामदार, प्रीया जाधव आदी शिक्षकांचा किरणच्या यशात विशेष योगदान आहे.