राज्यभरातील अंगणवाडीसेविका आंदोलनाच्या पवित्र्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:41 IST2021-02-24T04:41:48+5:302021-02-24T04:41:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोना काळात तत्पर सेवा दिलेल्या राज्यभरातील अंगणवाडी सेविकांचे जानेवारीपासून मानधन रखडले आहे. आता फेब्रुवारीही ...

राज्यभरातील अंगणवाडीसेविका आंदोलनाच्या पवित्र्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोना काळात तत्पर सेवा दिलेल्या राज्यभरातील अंगणवाडी सेविकांचे जानेवारीपासून मानधन रखडले आहे. आता फेब्रुवारीही संपत आला आहे. दोन महिने मानधन न मिळाल्याने या सेविकांवर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारच्या या मनमानीमुळे दोन लाख सेविकांमध्ये तीव्र संताप असून, त्या आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राज्यभरात दोन लाख अंगणवाडीसेविका, मदतनीस कार्यरत आहेत. तुटपुज्य मानधनावर सेवा देत असलेल्या या सेविकांची आर्थिक स्थिती आधीच डबघाईला आली आहे. त्यात सरकारकडून मानधन न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या सेविकांचे मानधन तत्काळ द्या, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा येथील महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष एम. ए. पाटील आणि सरचिटणीस बृजपाल सिंह यांनी राज्य सरकारला दिला आहे.
दरम्यान, जानेवारीचे मानधन न मिळाल्याने महिनाभरापासून संबंधित मंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अनेकदा पत्रव्यवहार केला आहे. राज्य सरकारकडून मानधनाची रक्कम तातडीने न दिल्यास नाइलाजाने अंगणवाडीसेविका मंत्रालयावर तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा सिंह यांनी दिला.