पावणेदहा कोटींच्या कामांना मंजुरी
By Admin | Updated: April 24, 2017 02:17 IST2017-04-24T02:17:26+5:302017-04-24T02:17:26+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत नऊ कोटी ७४ लाख रुपये खर्चाच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली.

पावणेदहा कोटींच्या कामांना मंजुरी
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत नऊ कोटी ७४ लाख रुपये खर्चाच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली.
‘अ’ प्रभागात खोदलेल्या कूपनलिकांची कामे झाली नसल्याने त्याला मंजुरी देऊ नये, असा आक्षेप भाजपा नगरसेविका उपेक्षा भोईर यांनी या वेळी घेतला. त्यावर, कामे प्रत्यक्षात झाली आहे की नाही, हे समितीच्या निदर्शनास आणावे, असे आदेश सभापती रमेश म्हात्रे यांनी दिले. मात्र, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक यांनी कामे झालेली असल्यानेच विषय मंजुरीला आणला असल्याचे स्पष्ट केले.
मागील वर्षी पाणीटंचाई निवारणासाठी २५ कोटी रुपये खर्चाचा आराखडा महापालिकेने तयार केला होता. त्यानुसार, २७ गावे व ‘अ’ प्रभागातील काही गावांमध्ये कूपनलिका टाकून हॅण्डपंप बसवण्याचे काम करण्यात आले. त्याला मंजुरी देण्याचा विषय पटलावर आला असता भोईर यांनी त्याला हरकत घेतली. प्रत्यक्षात तेथे काम झालेले नसल्याचा आरोप केला. मात्र, काम झाल्याशिवाय विषय मंजुरीला कसा आणणार, असा खुलासा अभियंता पाठक यांनी केला. ‘ई’ प्रभागातही ८० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी टाकणे, डोंबिवली पूर्वेतील सार्वजनिक वापराच्या विहिरीचा गाळ काढणे, दुरुस्ती करून घेणे, डोंबिवली ‘फ’ प्रभागात १० ठिकाणी कूपनलिका खोदणे, कल्याण पूर्वेतील ग्रामीण भागात हॅण्डपंप बसवणे, हे विषय पाणीपुरवठ्याशी संबंधित असल्याने त्याला सभापतींनी तातडीने मंजुरी दिली.
महापालिकेने आमदार गणपत गायकवाड यांच्या आमदार निधीतून तीन शववाहिका व तीन घंटागाड्या खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. आंबिवली रोडवर पथदिवे लावले जाणार आहेत. त्यासाठी ५० लाखांच्या कामाला मंजुरी देण्यात आली. यापूर्वी त्याठिकाणी दिव्याची व्यवस्थाच नव्हती का, असा मुद्दा सदस्य अर्जुन भोईर यांनी उपस्थित केला. महापालिका रुग्णालयांना लॅबोरेटरी साहित्य पुरवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. अग्निशमन दलाची साधनसामग्री खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी ३८ लाख रुपये खर्च होणार आहे.
डोंबिवलीतील शिवमंदिर स्मशानभूमीसाठीअतिरिक्त बर्निंग स्टॅण्ड खरेदी करण्यात येणार आहेत.
जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमावर पाच लाख १० हजार रुपये, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी उभारलेल्या मंडपावर दोन लाख ८७ हजार रुपये खर्च झाले आहेत. महापालिकेची प्रकल्प डॉक्युमेंटरी तयार करण्यासाठी सात लाखांचा खर्च झाला आहे. कल्याणमधील काळातलाव येथील बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी रोषणाई, एलईडी स्क्रीन, व्हिडीओ शूटिंग, जनरेटर यासाठी ३४ लाख रुपयांचा खर्च झाला. त्यालाही मंजुरी दिली आहे. (प्रतिनिधी)