खंडणीसाठी धमकावल्यानं सलून व्यावसायिकाची आत्महत्या; डायरीत ५ जणांची नावे लिहिली मग...
By जितेंद्र कालेकर | Updated: February 1, 2023 22:31 IST2023-02-01T22:30:39+5:302023-02-01T22:31:11+5:30
ठाण्यातील धक्कादायक घटना: दोघांना अटक

खंडणीसाठी धमकावल्यानं सलून व्यावसायिकाची आत्महत्या; डायरीत ५ जणांची नावे लिहिली मग...
ठाणे: एका टोळक्याकडून वारंवार खंडणीसाठी तसेच पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याच्या संशयावरून धमकावण्यात येत असल्याने मनीष शर्मा (३३, रा. लोकमान्यनगर, ठाणे) या सलून व्यावसायिकाने आपल्याच दुकानात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सचिन मयेकर (५६) आणि धीरज वीरकर या दोघांना अटक केल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांनी बुधवारी दिली.
लोकमान्यनगर पाडा क्रमांक चार येथे मनीष यांचे केशकर्तनालयाचे दुकान होते. याच दुकानात जाऊन वीरकर याच्यासह त्याचे इतर चार साथीदार हे शस्त्राच्या धाकावर ठार मारण्याची धमकी देत महिना तीन हजारांच्या खंडणीची मागणी करीत होते. ही खंडणी दिली नाहीतर तुझे दुकान चालू देणार नाही. पोलिसांना तक्रार केली तर लोकमान्यनगरमध्ये राहू देणार नाही, अशी धमकी मनीषला २९ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास दिली होती. तसेच वीरकरसह त्याच्या अन्य साथीदारांनी त्याला मारहाण करून कैची मारली होती. ही कैची त्याने चुकविली होती. त्यानंतर ३० जानेवारी रोजी मयेकर याने माझ्या मुलाला पोलिस घेऊन गेले असून त्यांनी जर मुलाला सोडले नाहीतर मी तुला दुकान उघडू देणार नाही, अशी धमकी दिली. या सर्व प्रकारामुळे भेदरलेल्या मनीषने आपल्याच दुकानात ३१ जानेवारी रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केली.
मुळात, धीरज वीरकर याला वेगळ्याच खंडणीच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली होती. मात्र, ही अटक मनीषमुळेच झाल्याचा समज मयेकर यांचा झाला. त्यातूनच त्यांनी त्याला धमकी दिली. सर्व घटनाक्रम मनीषने आत्महत्येपूर्वी आपल्या डायरीत नोंदवून सचिन मयेकर, धीरज वीरकर अशा पाच जणांची नावे टाकल्याने या सर्वांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे, खंडणी उकळणे या कलमांखाली गुन्हा नोंद झाला. त्यापैकी सचिन आणि धीरज या दोघांना अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सदाशिव निकम यांनी दिली.