साई पक्षाची घालमेल वाढली
By Admin | Updated: March 9, 2017 03:22 IST2017-03-09T03:22:04+5:302017-03-09T03:22:04+5:30
उल्हासनगरच्या राजकारणात भाजपाला पाठिंबा देऊनही पदरी काही पडण्याची शक्यता दिसत नसल्याने साई पक्षाची घालमेल सुरू झाली असून त्यांनी विकासाच्या

साई पक्षाची घालमेल वाढली
उल्हासनगर : उल्हासनगरच्या राजकारणात भाजपाला पाठिंबा देऊनही पदरी काही पडण्याची शक्यता दिसत नसल्याने साई पक्षाची घालमेल सुरू झाली असून त्यांनी विकासाच्या मुद्दयावर पंधरवड्यात पुन्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
उल्हासनगरमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यावर साई पक्षाने आधी शिवसेनेसोबत जाण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र पद सोडण्यात यापूर्वी खळखळ केल्याने दोन्ही पक्षांतील संबंध फारसे मधूर नाहीत. शिवाय हे दोन्ही पक्ष एकत्र आल्यानंतरही सत्तेचे गणित पूर्ण जुळत नव्हते. त्यामुळे साई पक्षाने लगोलग भाजपाच्या नेत्यांसोबत ‘वर्षा’वर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि उल्हासनगरमध्ये सत्तेसाठी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. हा पाठिंबा उल्हासनगरच्या विकासासाठी असल्याचेही साई पक्षाने जाहीर केले होते. साई पक्षाचा पाठिंबा घेण्यास भाजपातील मोठ्या गटाचा विरोध होता. त्यापेक्षा शिवसेनेसोबत जाण्याची त्यांची सूचना होती. गेली दहा वर्षे सत्तेसाठी पाठिंबा देताना महापौरपदासह अन्य महत्त्वाची पदे पदरात पाडून घेण्याची सवय असल्याने त्या पक्षात गेले आठवडाभर चलबिचल सुरू होती. त्यात भाजपाच्या नेत्यांनी बिनशर्त पाठिंबा खूपच मनावर घेतल्याने, त्यांनी त्यानंतर साई पक्षाला कोणतेही आश्वासन न दिल्याने या पक्षाच्या नेत्यांची घालमेल सुरू झाली. खोरखरीच पदरात काही पडले नाही, तर आर्थिक गणिते जुळवायची कशी असा त्यांच्यासमोरील महत्वाचा प्रश्न होता. त्यात ‘वर्षा’वर नेणारे नेते आता स्थानिक पातळीवर लक्ष घालत नसल्याने साई पक्षाची पुरती कोंडी झाल्याचे चित्र होते. त्यातून काहीतरी तोडगा निघावा आणि भाजपाने सत्तेत सहभागी करून घ्यावे, म्हणूनच त्यांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची चर्चा रंगली होती.
कंत्राटांच्या पारदर्शकतेचा वाद
साई पक्ष हा ज्या आर्थिक गटाचे प्रतिनिधित्त्व करतो, त्या गटाचे आजवर उल्हासनगरच्या बहुतांश कंत्राटांवर वर्चस्व राहिले आहे. ते मोडून काढावे अशी भाजपातील एका गटाची भूमिका आहे. तसे झाले तरच उल्हासनगरच्या विकासातील नेहमी येणारे अडथळे दूर होतील आणि विकासाचा मार्ग मोकळा होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी उल्हासनगरच्या कारभारात पारदर्शकता असावी असा मुद्दा पुढे आणून साई पक्षाचे पंख छाटण्याचे काम सुरू केले आहे. (प्रतिनिधी)
शिवसेना-भाजपा संबंधांत सुधारणा
मुंबईत शिवसेनेच्या महापौरांना भाजपाने पाठिंबा दिल्याने, ठाण्यात शिवसेनेच्या महापौरपदाविरूद्धचा उमेदवार मागे घेतल्याने आणि कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेने भाजपाला त्यांच्या वाट्याची पदे आढेवेढे न घेता दिलियाने या दोन्ही पक्षातील संबंध सुधारू लागले आहेत. त्याची धास्ती साई पक्षाने घेतली आहे.
शिवसेनेने उल्हासनगरात भाजपाला असाच पाठिंबा दिला, तर साई पक्षाची आवश्यकताच भासणार नाही, हे त्यांच्या लक्षात आले आहे. त्यात भाजपाने आपल्याला पाठिंबा देणाऱ्यांसोबत जाऊन आपल्या गटाची कोकण आयुक्तांकडे स्वतंत्र नोंदणीही करून टाकली आहे.
महापौर आमचाच : आयलानी
पक्षाचे माजी अध्यक्ष आणि नगरसेवक जमनुदास पुरस्वानी यांची गटनेतेपदी नियुक्ती केल्याची माहिती भाजपाचे शहराध्यक्ष कुमार आयलानी यांनी दिली. उल्हासनगरचा महापौर काहीही झाले तरी भाजपाचाच असेल, असे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले.
शिवसेना आली
तरीही सोबत : ईदनानी
आम्ही शहर विकासासाठी भाजपा सोबत आहोत. विकास आराखडयाला मंजुरी, अंबरनाथ-कल्याण महामार्गाचे अर्धवट काम त्वरित सुरू करणे, बाधित व्यापाऱ्यांना पर्यायी जागा देणे आदी मागण्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीत केल्याचे साई पक्षाचे नेते जीवन इदनानी यांनी सांगितले.
भाजपने पुढील काळात शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेतले, तरी साई पक्षाचा भाजपाला पाठिंबा कायम राहील, असे इदनानी म्हणाले.
ओमी यांच्याही मागण्या सुरू
साई पक्षाला उल्हासनगरमध्ये पुन्हा मोकळे रान दिले, तर भाजपाला उल्हासनगरात उभे राहणे कठीण जाईल, यावर पक्षातील एका गटाचा भर असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, भाजपाच्या नगरसेवकांतील मोठा गट माझा आहे, असे प्रत्यक्ष सुचवत ओमी कलानी यांनीही महापौरपदासह आपल्या मागण्या पुढे रेटण्यास सुरूवात केली आहे.