ठामपा विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी महिलारक्षक
By Admin | Updated: September 1, 2016 02:57 IST2016-09-01T02:57:04+5:302016-09-01T02:57:04+5:30
कोपरी येथील महापालिकेच्या शाळेत बोर्डाच्या सुरक्षारक्षकांनी दोन विद्यार्थिनींवर केलेल्या अत्याचाराच्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर आता विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी प्रत्येक पालिका

ठामपा विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी महिलारक्षक
ठाणे : कोपरी येथील महापालिकेच्या शाळेत बोर्डाच्या सुरक्षारक्षकांनी दोन विद्यार्थिनींवर केलेल्या अत्याचाराच्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर आता विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी प्रत्येक पालिका शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा आणि पुरुष सुरक्षारक्षकांऐवजी दिवसपाळीसाठी महिला सुरक्षारक्षक नेमण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बुधवारी झालेल्या महासभेत घेण्यात आला.
एकीकडे महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी तसेच शाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी नव्या योजनांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले असतानाच दुसरीकडे कोपरी परिसरातील महापालिका शाळांतील सुरक्षारक्षकांच्या कृत्यामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणात मुख्याध्यापिकेसह पाच शिक्षिकांवर निलंबनाची कारवाई केली आहे. पाचवीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनींसोबत घडलेल्या प्रकारामुळे अनेक पालकांना धक्का बसला असून या घटनेमुळे त्यांच्या मनात धडकी भरली आहे. तसेच विद्यार्थिनींमध्येही भीतीचे वातावरण आहे. यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाय करण्याची मागणी पुढे आली होती. या घटनेचे पडसाद बुधवारच्या महासभेतदेखील उमटले. कोपरीच्या घटनेनंतर महापालिका शाळेतील विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने कोणती पावले उचलली आहेत, असा सवाल सेनेच्या महेश्वरी तरे यांनी केला. तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तसेच विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पालिकेच्या सर्वच शाळांमध्ये महिला सुरक्षारक्षक नेमण्याचा पर्याय नगरसेविका यांनी सुचवला. (प्रतिनिधी)