पंडितराव वक्तृत्व स्पर्धेत रुईया महाविद्यालय विजेते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:42 IST2021-03-23T04:42:59+5:302021-03-23T04:42:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : महाविद्यालयीन विश्वात मानाच्या मानल्या जाणाऱ्या कै. नी.गो. पंडितराव स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक ...

पंडितराव वक्तृत्व स्पर्धेत रुईया महाविद्यालय विजेते
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : महाविद्यालयीन विश्वात मानाच्या मानल्या जाणाऱ्या कै. नी.गो. पंडितराव स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून मधुरा लिमये या रामनिवास रुईया महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीने विजेतेपदावर नाव कोरले. तर, उपविजेतेपद रोहन कवडे या पुण्याच्या अप्पासाहेब जेधे महाविद्यालयातील विद्यार्थ्याला मिळाले.
ठाण्यातील श्री समर्थ सेवक मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या या स्पर्धेचे यंदाचे ५२ वे वर्ष होते. या स्पर्धेत तिसरा क्रमांक पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगची विद्यार्थिनी सानिका जोशी हिला मिळाला. तर, पुण्यातीलच स.प. महाविद्यालयाची ज्ञानदा धारणकर हिला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ही स्पर्धा ऑनलाइनद्वारे घेण्यात आली. नियोजित विषयांच्या पहिल्या फेरीत राज्यभरातील ८० स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धकांनी सात मिनिटांच्या भाषणाचे व्हिडीओ रेकॉर्ड करून पाठवले. त्यातील १० स्पर्धकांची निवड उत्स्फूर्त विषयाच्या अंतिम फेरीसाठी करण्यात आली होती. अंतिम फेरी रविवारी सकाळी ऑनलाइन माध्यमावर पार पडली.
स्पर्धकांनी तीन मिनिटांत आयत्या वेळच्या विषयाची मांडणी केली. त्यातून विजेत्यांची निवड करण्यात आली. मनीष मोहिले, डॉ. निर्मोही फडके, प्रा. निखिल कारखानीस, मृदुला जोशी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. उत्स्फूर्त विषयांच्या स्पर्धेनंतर थोड्याच वेळात स्पर्धा समिती सदस्य योगेश भालेराव यांनी विजेत्यांची घोषणा करण्यात आली. तत्पूर्वी, मंडळाचे अध्यक्ष अनिल हजारे यांनी प्रास्ताविक केले. स्पर्धा समितीचे चिटणीस डॉ. चैतन्य साठे यांनी स्पर्धेच्या आयोजनाबद्दलची भूमिका विशद केली. रवींद्र मांजरेकर यांनी परीक्षकांचा परिचय करून दिला. तर, पूर्णिमा जोशी यांनी स्पर्धेचे सूत्रसंचालन केले.
--------------------